वन्यप्राण्यांनी मका, कपाशी, ज्वारी पिकांचे केले नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST2021-08-20T04:20:35+5:302021-08-20T04:20:35+5:30
शेतकऱ्यावर पीक नुकसानीची कुऱ्हाड कोसळल्याने शेतकरी चांगलाच अडचणीस सापडत असल्याचे चित्र आहे. वाडे तळाव शिवार हा डोंगराळ भागालगत व ...

वन्यप्राण्यांनी मका, कपाशी, ज्वारी पिकांचे केले नुकसान
शेतकऱ्यावर पीक नुकसानीची कुऱ्हाड कोसळल्याने शेतकरी चांगलाच अडचणीस सापडत असल्याचे चित्र आहे.
वाडे तळाव शिवार हा डोंगराळ भागालगत व वनभागाच्या हद्दीलगत आहे. वनविभागाने लावलेल्या विविध झाडांची हिरवळही परिसरात आहे. या भागामध्ये रानडुक्कर, हरिणी, रुई, सायड यासह वन्यप्राण्यांचा नेहमी वावर असतो. मात्र, सध्या खरीप हंगामाची पिके पाऊस पाण्याअभावी नुकसानीच्या वाटेवर असताना शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून कष्ट, मेहनतीने, पैसा उभारून पिकांची निगा ठेवली. महिनाभर गायब झालेला पाऊसही नुकताच बरसल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. शेतकरी आनंदाने सुखावले. मात्र, पाऊस पडला अन दोन दिवसांतच रानडुकरांसह वन्यप्राण्यांच्या कळपांनी धुमाकूळ घालीत मका, ज्वारी पिकांसह अन्य पिकांना जमीनदोस्त करीत नुकसानीचा जणू सपाटाच सुरू केला आहे.
सुभाष सुकलाल परदेशी या शेतकऱ्याने एक एकरमध्ये मका लागवड केली होती. मेहनतीने व पैसा उभारून मका पीक कणसांत दाणे भरून परिपक्व होण्याच्या मार्गावर होते. एका महिन्यात मका पीक कापणीवर आले असते. पावसाने हजेरी लावली. त्यात रानडुकरांसह वन्यप्राण्यांनी जवळपास अर्धा एकर क्षेत्राचे मका पीक जमीनदोस्त केले आहे. मका कणसेही वन्यप्राण्यांनी खाऊन नुकसान केले आहे. या शेतकऱ्याचे जवळपास २० ते २५ हजारांचे नुकसान झाले आहे. वन्यप्राण्यांचा उपद्रव सुरूच आहे. त्यामुळे मक्याचे पूर्ण पीक पूर्ण हाती येते की नाही? अशी चिंता .सुभाष परदेशी या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
कपाशी पिकाच्या झाडावरील परिपक्व कैऱ्याही सायड हा प्राणी खाऊन नुकसान करीत आहे. तसेच दुसरे शेतकरी डाॅ. कर्तारसिंग सरदारसिंग परदेशी यांचेही या शिवारात ८ एकर ज्वारीचे पीक उभे आहे. या ज्वारी पिकाचेही वन्यप्राण्यांनी नुकसान सुरू केलेले आहे. हातातोंडाशी येत असलेल्या हंगामातील पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट येऊ पाहत आहे. असेच पिकांचे नुकसान सुरू राहिल्यास अनेक शेतकऱ्यांना या पीक नुकसानीचा फटका बसणार आहे.
याकडे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या डोंगराळ भागालगत मळगाव, वाडे, तांदुळवाडी, बांबरुड प्र. ब., कजगाव असे शेतशिवार आहेत. या सर्व भागांमध्ये वनविभागाची हद्द आहे. वन्यप्राण्यांचा सर्वत्र वावर असतो. त्यामुळे पिकांचे नुकसान होताना दिसते. तरी वनविभागाने तत्काळ या प्राण्यांचा बंदोबस्त करावा. वनविभागाच्या हद्दीपर्यंत तारकंपांऊड करावे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तसा तत्काळ सर्व्हे करावा. पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाडे परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरीवर्गातून होताना दिसत आहे.
190821\19jal_1_19082021_12.jpg
वाडे तळाव परिसरात सुभाष परदेशी यांच्या मका पिकाचे वन्यप्राण्यांनी केलेले नुकसान.