दलितवस्ती सुधार योजनेच्या
ई-टेंडर प्रक्रियेची चौकशी योग्यच
रावेर : रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांचे निवेदन
रावेर : दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत निकृष्ट दर्जाच्या विकासकामांची व ई-टेंडर प्रक्रियेची चौकशी करण्याची जि. प. सदस्य नंदकिशोर महाजन यांनी केलेली मागणी जातीय द्वेष भावनेतून वा दलित समाजाच्या विकासाला खीळ घालणारी नाही तर दलितवस्ती सुधार योजनेचा वर्षानुवर्षांपासून गैरफायदा घेणार्या ठेकेदाराविरुद्ध असल्याने त्यांनी केलेली मागणी योग्य आहे. या मागणीचे समर्थन करीत असल्याचे निवेदन रिपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांना दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, रावेर तालुक्यातील दलितवस्ती सुधार योजनेची विकासकामे करताना ग्रामसेवक व संबंधित ठेकेदारांमध्ये अनेक वर्षांपासून सांगड व अनियमितता, ई-टेंडरमध्ये असलेला घोळ व झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करण्यासाठी जि. प. सदस्य नंदकिशोर महाजन यांनी केलेली मागणी योग्य असून, त्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे. किंबहुना, ठरावीक ठेकेदारांचे लांगुलचालन न करता या टेंडर प्रक्रियेच्या चौकशीमुळे सुशिक्षित बेरोजगार ठेकेदार व अभियंत्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
निवेदनावर राजू सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष विक्की तायडे, कमलाकर गाढे, भीमराव तायडे, सतीश निकम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.