मनपाच्या ट्रॅक्टरच्या धडकेत सायकलस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST2021-08-18T04:21:54+5:302021-08-18T04:21:54+5:30
जळगाव : चिखलात रुतलेली सायकल काढत असताना कचरा संकलन करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने सुरेश देवीदास सोमवंशी (वय ५५, ...

मनपाच्या ट्रॅक्टरच्या धडकेत सायकलस्वार ठार
जळगाव : चिखलात रुतलेली सायकल काढत असताना कचरा संकलन करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने सुरेश देवीदास सोमवंशी (वय ५५, रा. कासमवाडी) हे ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता कासमवाडीतील कब्रस्तानाजवळ घडली. मागील चाकाखाली आल्याने सोमवंशी यांना जबर दुखापत झाली व त्यात त्यांचा जीव गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश सोमवंशी हे शिलाई मशीन दुरुस्तीचे काम करतात. मंगळवारी सकाळी ८ वाजता ते जामा मश्जिदजवळील त्यांच्या दुकानात गेले. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास जेवण करण्यासाठी सायकलने घरी निघाले जात असताना कासमवाडी ते कब्रस्तानदरम्यान त्यांची सायकल चिखलात रुतली होती. ही सायकल काढत असताना महापालिकेच्या ठेकेदाराचे कचरा संकलन करणाऱ्या ट्रॅक्टरने (एमएच १९ एपी ७३३०) त्यांना जोरदार धडक दिल्याने ते मागच्या चाकात आले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघात होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन सोमवंशी यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व संजय धनगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोमवंशी यांच्या अपघाताचे वृत्त कळताच पत्नी नूतन, मुलगी प्रणाली यांनी रुग्णालयात धाव घेऊन एकच हंबरडा फोडला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा हर्षल असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने कासमवाडी येथे हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.