सक्तीच्या लॉकडाउननंतरही गर्दी कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:50 IST2020-05-11T12:50:41+5:302020-05-11T12:50:55+5:30
प्रतिबंधीत क्षेत्रात २४ तास बंदोबस्त : तळीरामांची मात्र पुन्हा निराशा, प्रशासनाच्या आदेशाचा फज्जा

सक्तीच्या लॉकडाउननंतरही गर्दी कायमच
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर तातडीने उपाय योजना म्हणून जिल्ह्यातील जळगाव, पाचोरा, भुसावळ, अमळनेर व चोपडा या शहरातील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर व्यवहार रविवारपासून लॉकडाउन संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी काढले, मात्र शहरात रविवारी या आदेशाचा फज्जा उडालेला दिसून आला. नागरिकांनी नेहमीप्रमाणे शहरात वावर कायम ठेवल्याने दुपारचे तीन तास वगळता गर्दी कायम होती.
शहरातील लक्ष्मी नगर, नेहरु नगर, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी, अक्सा नगर, जोशी पेठ, समता नगर यासह शहरातील १४ प्रतिबंधीक क्षेत्रात मात्र पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आल्याने या भागात शुकशुकाट जाणवला. महाबळ, भाउंचे उद्यान, रामानंद नगर, फुले मार्केट परिसर, बळीराम पेठ, गणेश कॉलनी, कृषी उत्पन्न बाजार समिती रोड या भागात नेहमीप्रमाणेच गर्दी होती व दुकाने तसेच विक्रेतेही सक्रीय होते. रविवारी शहरातील एकही मद्याचे दुकान उघडले नाही, त्यामुळे तळीरामांची मात्र निराशा झाली होती.
रस्त्यावर तुरळक पोलीस
प्रतिबंधीत क्षेत्रात २४ तास पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला असला तरी मुख्य रस्त्यावर नागरिकांना हटकण्यासाठी अगदी तुरळक पोलीस दिसत आहेत. काव्यरत्नावली चौकात तर फक्त सकाळीच एखाद दोन कर्मचारी दिसून आले.
शहरातील इतर पॉर्इंटवर देखील कर्मचारी नव्हते. सिंधी कॉलनीत मात्र पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. लक्ष्मी नगरात तर १ अधिकारी व ४ कर्मचारी दोन शिफ्टमध्ये लावण्यात आले आहेत. नेहरु नगरातही ४ कर्मचारी तैनात होते.
पाच दिवसच मिळाली शिथीलता
३ मे पर्यंतचा लॉकडाऊन संपल्यानंतर जिल्हास्तरावर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्याचे अधिकार देण्यात आले होते, त्यामुळे जिल्ह्यात ५ मे पासून काही अंशी शिथीलता मिळाली होती. त्यात प्रामुख्याने मद्याची दुकाने सुरु करण्यात आली होती. मात्र हे आदेश पाच दिवसापुरतेच राहिले. या पाच दिवसात शहर व जिल्ह्यात रग्ण संख्या इतकी झपाट्याने वाढली की सक्तीचा लॉकडाऊन आदेश काढण्याची वेळ जिल्हाधिकाºयांवर आली.
रविवारी जिल्ह्यात कोरोनाचे १७२ तर शहरात २२ इतकी एवढी
होती.
पेट्रोलपंप वेळा निश्चित
शहरात १४ प्रतिबंधीक क्षेत्र (कण्टेंमेंट झोन) घोषीत करण्यात आले आहेत. कोरोना बाधीतांची संख्या २२ वर पोहचली आहे, त्यामुळे या क्षेत्रातील कोणीही व्यक्ती लॉकडाऊन संपेपर्यंत कुठल्याही सार्वजनिक आस्थापनेत कामावर येणार नाही याबाबत जिल्हाधिकाºयांनी आदेश दिलेले आहेत. त्याशिवाय शहरांमध्ये पेट्रोलपंपांच्याही वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेतच पेट्रोलपंप सुरु ठेवण्याचे आदेश आहेत. रविवारी सुटीचा दिवस असूनही कॉलनी व मुख्य बाजारपेठेत गर्दी होती. रस्त्यावर वाहनांची संख्या बºयापैकी होती.
ड्रोनचा उपयोग का नाही?
कायदा सुव्यवस्था व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधीत क्षेत्रात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्रत्येक जिल्ह्याला ड्रोन पुरविण्यात आले आहेत. जळगावला देखील ड्रोन दाखल झाले असून त्याचे प्रात्यक्षितही घेण्यात आले आहे. मग या ड्रोनचा पोलीस दलाकडून वापर का केला जात नाही. धुळे शहरात प्रतिबंधीत क्षेत्रात भाजीपाला विक्रेत्याला ड्रोननेच टिपले होते. तेथे ड्रोनचा चांगला उपयोग होऊ लागला. शहर व जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रात या ड्रोनचा वापर केला तर गर्दीवर नियंत्रण तर राहिलच पण कोरोनाला रोखण्यात मोठी मदत होऊ शकते.