पीक कापणी प्रयोगाला उद्यापासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:18 IST2021-07-31T04:18:05+5:302021-07-31T04:18:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : शेतकऱ्यांच्या पीकविमा कापणी प्रयोगाच्या पहिल्या टप्प्याला १ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. तालुक्यातील आठ महसूल ...

Crop harvesting experiment starts from tomorrow | पीक कापणी प्रयोगाला उद्यापासून सुरुवात

पीक कापणी प्रयोगाला उद्यापासून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : शेतकऱ्यांच्या पीकविमा कापणी प्रयोगाच्या पहिल्या टप्प्याला १ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. तालुक्यातील आठ महसूल मंडळात ३८ गावांमध्ये २०० पीक कापणी प्रयोग घेतले जाणार आहेत.

महसूल विभागातर्फे जाहीर होणाऱ्या पैसेवारीवर आधारित पीकविमा देण्याची पद्धत बंद झाली आहे. आता शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास, उत्पन्न न आल्यास, बियाणे न उगवल्यास महसूल, कृषी व जिल्हा परिषद विभागातर्फे संयुक्त समिती नेमून पीक कापणी प्रयोग घेतले जाणार आहेत.

अनेकदा शेतकऱ्यांना कमी पावसाने उत्पन्न येत नाही तरी त्यांना पीकविमा मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. मात्र शासनाने त्यासाठी रँडम पद्धतीने गावांची निवड केली आहे. पहिल्या टप्प्याला १ पासून सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात समितीने ज्या पिकाचे प्रयोग ज्या गावाला घ्यायचे आहेत त्या ठिकाणी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी करून त्यातील दोन शेतकऱ्यांची निवड करून ठेवायची आहे.

दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबरनंतर उत्पन्न यायला सुरुवात झाल्यावर पिकानुसार प्रत्यक्ष पीक काढणे सुरू होईल तेव्हा १ गुंठा म्हणजे १० बाय १० मीटरमधील पीक किती आले ते त्याच जागेवरून ऑनलाइन ॲपमध्ये माहिती भरली जाणार आहे.

तालुक्यातील आठ मंडळे

अमळनेर, नगाव, पातोंडा, अमळगाव, मारवड, शिरूड, वावडे, भरवस ही आठ मंडळे आहेत. त्यातील गावे ऐच्छिक पद्धतीने निवडली आहेत.

३८ गावांत होणार प्रयोग

तालुक्यात ३८ गावांत समिती पीक कापणी प्रयोग घेणार आहे. ती अशी गलवाडे बुद्रुक, ढेकू सिम, अमळनेर, अंचलवाडी, इंदपिंप्री, कचरे, कुऱ्हे सिम, धुरखेडा, नांद्री, पिंगळवाडे, जळोद, हिंगोणे सिम, कळमसरे, डांगरी, पाडळसरे, खापरखेडा प्र.ज. सबगव्हाण, भोरटेक, लोण पंचम, झाडी, आनोरे, जवखेडा, देवगाव, बिलखेडा, मठगव्हाण, मुंगसे, कामतवाडी, धुपी, सात्री, मंगरूळ, एकतास, तांदळी, भिलाली, भरवस, बोदर्डे, बोरगाव, वाघोदा, बोहरा, पिंपळी प्र.ज. या गावांचा समावेश आहे.

अशी आहे समिती

ज्या गावात पीक कापणी प्रयोग घ्यायचा आहे त्या ग्रामस्तरीय समितीत सरपंच, पोलीसपाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांची समिती असेल. ही समिती दिलेल्या सूचनेनुसार त्या त्या प्रकारच्या पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची प्रयोगासाठी निवड करून तक्त्यात ऑनलाइन माहिती पाठवेल.

कोणत्या पिकाचे किती प्रयोग

ज्वारी - १२

बाजरी - १८

मका- ९

तूर -१२

उडीद - १२

मूग - ३०

भुईमूग - १२

तीळ- ३०

सोयाबीन - ९

कापूस- ५०

कोट

पीकविमा पारदर्शी पद्धतीने मिळावा शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही म्हणून समिती आणि शेतकरी निवडप्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सरपंच, पोलीसपाटील व शेतकरी यांनी दक्ष राहून योग्य माहिती भरली जाईल म्हणजे तक्रारी राहणार नाहीत. - अनिल पाटील, आमदार, अमळनेर.

कोट

धुरखेडा हे गाव अस्तित्वात नसले तरी महसूल दप्तरी शिवार अस्तित्वात असल्याने त्या ठिकाणच्या प्रयोगात सरपंच, ग्रामसेवक यांचा समावेश नसेल. महसूल व कृषी विभाग शेतकऱ्यांच्या समक्ष प्रयोग करून अहवाल पाठवतील. - भारत वारे, तालुका कृषी अधिकारी, अमळनेर

Web Title: Crop harvesting experiment starts from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.