विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या हॉटेल मालकासह मॅनेजरविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST2021-07-03T04:11:40+5:302021-07-03T04:11:40+5:30
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार्सल सुविधेला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. असे असताना सुध्दा भुसावळ रस्त्यावरील 'जस्ट चिल' हॉटेल ...

विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या हॉटेल मालकासह मॅनेजरविरुध्द गुन्हा
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार्सल सुविधेला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. असे असताना सुध्दा भुसावळ रस्त्यावरील 'जस्ट चिल' हॉटेल येथे टेबल उपलब्ध करून जेवण देण्यात आले, तसेच विनापरवाना दारूची विक्री करण्यात आल्याचा प्रकार एमआयडीसी पोलिसांच्या छाप्यात समोर आला आहे. याप्रकरणी हॉटेल मालकासह मॅनेजरविरुध्द गुन्हा दाखल झाला असून ६ हजार ७८० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.
भुसावळ रस्त्यावरील 'जस्ट चिल' हॉटेल येथे विनापास परवाना दारू विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना गुरुवारी रात्री मिळाली. रात्री ९ वाजता पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी विनापरवाना दारू विक्री होत असताना आढळून आले. तसेच नागरिकांना जेवणासाठी टेबल उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे हॉटेल मालक सचिन पांडुरंग मराठे (रा. सुदर्शन कॉलनी) व मॅनेजर योगेश हरि कर्डीले (रा. सुप्रिम कॉलनी) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.