पोस्टाची विश्वासार्हता पोस्टमनच्या शिलेदारांमुळे टिकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 20:08 IST2020-10-08T20:05:42+5:302020-10-08T20:08:05+5:30
इंटरनेटच्या काळातही आजही लोक टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावर विश्वास कायम आहे.

पोस्टाची विश्वासार्हता पोस्टमनच्या शिलेदारांमुळे टिकून
संजय सोनार
चाळीसगाव, जि.जळगाव : प्रत्येकाच्या घरी पत्र वाटत फिरणारे खाकी कपड्यातील पोस्टमन काळाच्या ओघात कुठे तरी हरवल्याची जाणीव होत असली तरी आजमितीसही हे पोस्टमन दररोज शहरातल्या गल्लोगल्ली चढ-उतार करून पत्र पोहोचवण्यासाठी पोस्टमनला दूरदूर सायकलचीही रपेट मारावी लागते. त्यामुळे जागतिक टपाल दिनानिमित्ताने व्हॉट्सअॅपच्या जमान्यातही पोस्टाची विश्वासार्हता याच त्यांच्या शिलेदारांमुळे टिकून असल्याची प्रचिती येते. इंटरनेटच्या काळातही आजही लोक टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावर विश्वास कायम आहे.
‘डाकिया डाक लाया, खुशी का पैगाम कही दर्दनाक लाया’ हे गाणे प्रत्येकाला पोस्टाच्या काळात घेऊन जाते. परंतु, पोस्टाचा काळ हवाहवासा वाटला तरीही याची दुसरी बाजू म्हणजे अजूनही टपाल विभागाने कात टाकलेली नाही. आजही उन्हातान्हात, पाऊस-पाण्यात पोस्टमन्सना पत्र पोहोचवण्यासाठी दारोदारी फिरण्याशिवाय गत्यंतर नाही. एकीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी देश-विदेशात ‘डिजिटल इंडिया’चा नारा देत असताना दुसरीकडे टपाल विभाग मात्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रापासून अद्यापही कोसो दूर असल्याचे चित्र आहे.
रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे दररोज जा-ये करणाऱ्या टपालामुळे विलंब लागत आहे. रेल्वेऐवजी आता खाजगी वाहनातून स्वखर्चाने टपाल पाठविला जात आहे. परिणामी एक ते दोन दिवसाआड टपाल जातो.
चाळीसगाव मुख्य पोस्ट कार्यालयात एकूण १० पोस्टमन आहेत. शहरात पाडलेल्या झोननुसार नियमित वाटप केले जाते. तसेच एकूण ३५ कर्मचारी कार्यरत आहे. पुरेसे मनुष्यबळ असल्याने कामात अडचण भासत नाही.
सध्याचा जमाना हा इंटरनेट, ई-मेल आणि सोशल नेटवर्किंगचा आहे. प्रिय व्यक्तीशी संपर्क करणे अगदी एका क्लिकवर आले आहे. मात्र हा संपर्क सोपा झाला असला तरी त्यातला जिव्हाळा कमी झाल्याचे जाणवते. त्यामुळे टपाल विभागाला आता कात टाकण्याची गरज आहे.
व्हाट्सएपच्या ग्रुपमुळे अनेकांची झाली सोय
पोस्टमास्तर शिवदास बडगुजर यांनी ग्राहकांचा व्हाट्सएपचा ग्रुप तयार केला आहे. ज्येष्ठ नागरिक, कोविड रुग्णांना पोस्ट खात्यातून रक्कम काढावयाची असल्यास त्यांनी ग्रुपवर मेसेस टाकल्यास त्या ग्राहकांना पोस्टमनच्या माध्यमातून घरपोच पैसे पाठविण्याची उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा अनेक ग्राहक लाभ घेत आहेत. पोस्टमास्तर बडगुजर यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वडीलधाऱ्यांना नमस्कार व घरातील छोट्यांना गोड गोड पापा..
कबूतर जा जा... कबूतर जा जा... असे म्हणत चिठ्ठी पाठवणे. तसेच घोड्यावरून विशेष दूतामार्फत निरोप पाठवणे ही प्रथा कालबाह्य ठरुन टपालसेवेचा जन्म झाला. सध्याच्या युगात तर मोबाईल सेवा व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जग आगदी जवळ आले आहे व टपाल सेवेचा विसरच पडून गेला. सध्याचे चित्र असे आहे की टपाल कार्यालयाऐवजी सर्व व्यवहार मेल व इतर तंत्रज्ञानाचा वापर करून केले जातात.
सद्य:स्थितीत पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्रे कमी झाले असले तरी रजिस्टर, स्पीडपोस्ट व पार्सलची संख्या वाढली आहे. आवश्यक टपाल बंद झालेला नाही. याबरोबरच पोस्टात अनेक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांचा विश्वास अधिकाधिक वाढला आहे.
-शिवदास एकनाथ बडगुजर, पोस्टमास्तर, मुख्य पोस्ट, चाळीसगाव