कूपन प्रणालीमुळे दिव्यांग प्रमाणपत्र कार्यवाही झाली सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:22 IST2021-08-19T04:22:45+5:302021-08-19T04:22:45+5:30

जळगाव : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दर बुधवारी दिव्यांग बांधवांना रांगेतील त्रास...गैरसोय...आणि धक्काबुक्कीसारख्या अडचणींचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे दिव्यांग ...

The coupon system made the disability certificate process easier | कूपन प्रणालीमुळे दिव्यांग प्रमाणपत्र कार्यवाही झाली सोपी

कूपन प्रणालीमुळे दिव्यांग प्रमाणपत्र कार्यवाही झाली सोपी

जळगाव : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दर बुधवारी दिव्यांग बांधवांना रांगेतील त्रास...गैरसोय...आणि धक्काबुक्कीसारख्या अडचणींचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे दिव्यांग बांधवांची दर बुधवारी होणारी गर्दी आणि गैरसोय पाहता दिव्यांग मंडळाने आगाऊ बुकिंग कूपन प्रणालीला सुरुवात केली आहे. या प्रणालीमुळे दिव्यांग बांधवांची गैरसोयीपासून मुक्तता झाली असून बुधवार, १८ ऑगस्ट रोजी २०० लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्रा मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. आता सप्टेंबर महिन्यातील पाचही बुधवारची कूपनं संपली असून, शुक्रवारी २० ऑगस्टपासून बुधवार, ६ ऑक्टोबरचे कूपन कार्यालयीन वेळेत वितरित करण्यात येणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार, २८ जुलैपासून दिव्यांग मंडळ अद्ययावत सुविधांसह कार्यान्वित झाले आहे. दिव्यांग मंडळ अंतर्गत दिव्यांग बांधवांना दर बुधवारी प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु झाली. ज्या दिव्यांग बांधवांनी १८ ऑगस्टचे कूपन घेतले होते, अशा २०० दिव्यांगांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान करण्यात आली. तपासणी मुख्य गेट नं. २ कडील अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात तसेच ओपीडी कक्षात झाली. नेहमी दिसणारी गर्दी ही मर्यादित झाली.

यांनी केली तपासणी

उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे, मंडळाचे सचिव तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित यांच्यासह तज्ज्ञ डॉ. योगेश गांगुर्डे, डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. दिलीप महाजन, डॉ. विनोद पवार, डॉ.प्रसन्ना पाटील, डॉ. गिरीश राणे, डॉ. नेहा भंगाळे यांनी दिव्यांगांची तपासणी केली. डॉ. नवीन सोनवणे, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. प्राजक्ता पाटील, कर्मचारी चेतन निकम, दत्तात्रय पवार, अनिल निकाळजे, विशाल दळवी, आरती दुसाने, भूषण निकम, वाल्मिक घुले, विकास राजपूत, प्रकाश पाटील, अजय जाधव, विश्वजीत चौधरी यांनी सहकार्य केले.

अशी आहे प्रमाणपत्रासाठीची प्रक्रिया

दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी शासकीय संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. तेथे प्रमाणपत्र नूतनीकरणचीदेखील लिंक उपलब्ध आहे. या अर्जाची प्रत काढून वैद्यकीय अधीक्षक कक्षातून बुकिंग कूपन घ्यावे. कूपनवर दिलेल्या तारखेला अर्जासह आधारकार्ड, रेशनकार्ड, दोन पासपोर्ट फोटो व जुने दिव्यांग प्रमाणपत्र तथा संबंधित कागदपत्र घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे.

कूपन बुकिंग प्रणाली

दर बुधवारी २०० दिव्यांगांची तपासणी होणार आहे. दिव्यांग बांधव अथवा त्यांचे नातेवाईक यांनी संकेतस्थळावरील डाउनलोड केलेला फॉर्म व दिव्यांग बांधवाचे ओळखपत्र दाखवून दिव्यांग बोर्डात पडताळणी करावी. नंतर रुग्णालयाच्या कक्ष क्रमांक ११४ बी मध्ये वैद्यकीय अधिकारी कक्षात कोणत्याही दिवशी कार्यालयीन वेळेत कूपन प्राप्त करू शकतात. आता डोळ्यांनी दिव्यांग बांधवांना तारखेचे कूपन दाखवून नेत्रकक्ष (आय वॉर्ड) येथेच केसपेपरदेखील मिळेल व वैद्यकीय तपासणीदेखील होणार आहे. तर मानसिक दिव्यांग सोडून इतर दिव्यांग असलेल्या बालकांना कूपनची आवश्यकता नाही.

Web Title: The coupon system made the disability certificate process easier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.