पारोळा : हिरापूर फाट्यानजीक दोन मोटारसायकलींची समोरासमोर जबर धडक होऊन त्यात बाभळेनाग येथील पती-पत्नी व त्यांचा पाच वर्षांचा मुलगा जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. मोटारसायकलींची धडक इतकी जबर होती की, महिला व तिचा मुलगा एका कंटेनरखाली आले. नशिब बलवत्तर म्हणून दोघे जण बचावले.
बापू ओंकार माळी (३२), सुवर्णा बापू माळी (२८) आणि शिव बापू माळी (५ वर्षे) अशी या जखमींची नावे आहेत. त्यांना पुढील उपचारार्थ धुळे येथे हलविण्यात आले आहे. हे तीनही जण मोटारसायकलने पारोळ्याकडून बाभळेनाग गावाकडे जात होते. त्याचवेळी एरंडोलकडून येणाऱ्या मोटारसायकलस्वाराने त्यांना धडक दिली.
या जबर धडकेत बापू माळी हे बाजूला फेकले तर पत्नी सुवर्णा व मुलगा शिव हे समोरुन येणाऱ्या कंटेनरच्या खाली येत असतानाच कंटेनर चालकाने अर्जंट ब्रेक लावल्याने चिमुकल्यांसह आई बचावली आहे. धडक देणारे मोटरसायकलवरील दोघेजण वाहन सोडून हिरापूरच्या जंगलाकडे पळून गेले.
जखमींना सुनील आनंदा माळी, बाभळेनाग सरपंच ज्ञानेश्वर आधार माळी, सदस्य कल्पेश नाना पाटील, भगवान आधार माळी, अमोल सुभाष माळी, विकास तुकाराम माळी, मयूर ओंकार ठाकूर यांनी खासगी वाहनाने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. जखमींवर डॉ. योगेश साळुंखे, पंकज पाटील, प्रमोद सूर्यवंशी, अभिजीत राजपूत, प्रसाद राजहंस, राजू सोनार, दीपक पाटील आदींनी प्रथमोपचार केले. नंतर त्यांना पुढील उपचारार्थ धुळे येथे हलविण्यात आले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.