विद्युतखांब हटविण्यासाठी मनपाचाच निधी होणार खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST2021-08-18T04:21:36+5:302021-08-18T04:21:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी अडथळा ठरत असलेले विद्युतखांब हटविण्यासाठी लागणारा निधी मनपाकडूनच दिला जाणार ...

विद्युतखांब हटविण्यासाठी मनपाचाच निधी होणार खर्च
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी अडथळा ठरत असलेले विद्युतखांब हटविण्यासाठी लागणारा निधी मनपाकडूनच दिला जाणार आहे. २५ कोटी रुपयांच्या निधीतून शिल्लक असलेल्या ३ कोटींपैकी दीड कोटी रुपयांचा निधी विद्युतखांब हटविण्यासाठी महावितरणकडे वर्ग केला जाणार आहे. यासाठी राज्य शासनाची मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी मनपाकडून गेल्याच आठवड्यात राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली आहे.
विद्युतखांबांचे स्थलांतर गेल्या आठ महिन्यांपासून रखडले आहे. हे काम होत नसल्याने पुलाचे पुढील कामदेखील थांबले आहे. मात्र, हे काम करण्यासाठी निधी कोण देईल, यावर अनेक महिने विचारमंथन, टोलवाटोलवी सुरू होती. अखेर आता मनपा प्रशासनाकडूनच हा निधी दिला जाणार आहे. हा पूल जरी बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असला तरी मनपाकडे असलेला निधीदेखील राज्य शासनाकडूनच प्राप्त झाला होता म्हणून आता २५ कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेतूनच हा निधी दिला जाणार आहे. दरम्यान, राज्य शासनाकडे मनपाने पाठविलेल्या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांचीदेखील भेट घेणार आहेत. पुढील आठवड्यापर्यंत या निधीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळाल्यानंतर महावितरणमार्फत विद्युतखांब हटविण्याचा कामाला सुरुवात होणार आहे.