८०० कुलुपे घेऊन गाळे सील करण्यासाठी गेलेले मनपाचे पथक कारवाई न करताच परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST2021-07-31T04:17:45+5:302021-07-31T04:17:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांवर कारवाईसाठी गेलेले मनपाचे पथक कारवाई न करताच परत आल्याचा ...

८०० कुलुपे घेऊन गाळे सील करण्यासाठी गेलेले मनपाचे पथक कारवाई न करताच परतले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांवर कारवाईसाठी गेलेले मनपाचे पथक कारवाई न करताच परत आल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. गाळेप्रश्नी मनपा आयुक्तांनी मनपाचे डॅशिंग उपायुक्त संतोष वाहुळे व प्रशांत पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार, दुसऱ्याच दिवशी उपायुक्तांनीही मनपा कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून, गाळे सील करण्यासाठी सोबत ८०० कुलुपे घेऊन थेट जुने बी.जे. मार्केटमध्ये दाखल झाले. मात्र, याठिकाणी गाळेधारकांची संख्या वाढत असल्याचे पाहून मनपाचे पथक कोणतीही कारवाई न करताच परत आले आहे.
मनपाकडून आतापर्यंत अनेकवेळा अशाच प्रकारे मनपाचे पथक मार्केटपर्यंत पाठविण्यात आले आहे. मात्र, केवळ इशारा देऊन खाली हात परतले आहे. यावेळेस वाहुळे व पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपविल्यामुळे हे दोन्ही अधिकारी मनपाची थकीत रक्कम वसूल करतील, अशी अपेक्षा असताना, हे दोन्हीही अधिकारी मात्र कारवाई न करताच परत आले. दरम्यान, मनपाचे पथक परत आल्यानंतर नेहमीप्रमाणे मनपा प्रशासनातील अधिकारी व गाळेधारकांची बैठक झाली. या बैठकीत पुन्हा कोणताही तोडगा निघालेला नाही.
भाडे भरा, अन्यथा कारवाई - मनपा प्रशासन
गाळेधारकांसोबत झालेल्या बैठकीत मनपा उपायुक्त प्रशांत पाटील यांनीही मनपा आयुक्तांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे गाळेधारकांना थकीत भाड्याची रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. गाळेधारकांनी थकीत भाड्याची रक्कम भरली नाही, तर कारवाई ही करावीच लागणार असल्याची जाहीर भूमिका घेतली आहे. तसेच गाळेधारकांनी मनपाला सहकार्य करावे, असेही मनपा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
भाडे भरू, मात्र अवाजवी रक्कम नाही - गाळेधारक
मनपा प्रशासनासोबत बैठक झाल्यानंतर गाळेधारकांनी भाडे भरण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, मनपाने ज्याप्रमाणे अवाजवी स्वरूपात बिलांची रक्कम पाठविली आहे, ती भरणे शक्य नसल्याचे गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी सांगितले. पाचपट दंड रद्द करण्यासोबत दोन टक्के शास्तीची रक्कमदेखील रद्द करण्याची मागणी गाळेधारकांनी केली आहे. तसेच गाळे प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले असून, त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरच कारवाई करा, अशीही भूमिका गाळेधारकांनी घेतली आहे.