अमित महाबळ / जळगाव : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बहुप्रतिक्षित अशा महामंडळाचे वाटप कोणाला कशा पद्धतीने करायचे आणि त्यावर अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य म्हणून कोणाला संधी द्यायचे हे ठरले आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी जळगावमध्ये दिली. ते रविवारी, १७ ऑगस्टला पक्षाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार आहे. महामंडळाचे वाटप झाले आहे पण महामंडळ लगेच देणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर त्याचे वाटप केले जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, आत्ता महामंडळाचे वाटप केले तर लोक पद घेतील पण काम करणार नाहीत. म्हणून आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काम करा, तुमची कामगिरी दाखवा. त्यानंतरच अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य म्हणून महामंडळावर नियुक्ती देऊ, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.