भुसावळात नगरसेविकेस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 17:25 IST2019-09-29T17:24:02+5:302019-09-29T17:25:56+5:30
पालिका निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याचा राग मनात ठेवून माजी नगरसेविका नंदा निकम यांचे पती प्रकाश निकम यांच्यासह आठ जणांंनी घरात घुसून मारहाण केल्याची घटना २८ रोजी रात्री घडली.

भुसावळात नगरसेविकेस मारहाण
भुसावळ, जि.जळगाव : नगरपालिका निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याचा राग मनात ठेवून माजी नगरसेविका नंदा निकम यांचे पती प्रकाश निकम यांच्यासह आठ जणांंनी घरात घुसून मारहाण केल्याची घटना २८ रोजी रात्री घडली. याबाबतची फिर्याद नगरसेविका पूजा राजू सूर्यवंशी (रा.संभाजीनगर) यांनी दिली. त्यावरून आठ जणांंविरुद्ध बाजारपेठ पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, गेल्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीमध्ये माजी नगरसेवक नंदा निकम या निवडणुकीत उभ्या होत्या. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध विद्यमान नगरसेविका पूजा राजू सूर्यवंशी यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत पराभूत झाल्याचा राग मनात ठेवून माजी नगरसेविका निकम यांचे पती प्रकाश निकम, विनोद निकम, आकाश निकम, हेमंत निकम, रामदास निकम, अंकुश निकम , शिवा ज्ञानसिंग, आनंद नरवाडे आदींनी २८ रोजी रात्री साडेसातला नगरसेविका सूर्यवंशी यांचे पती राजू सूर्यवंशी यांना मारण्याच्या हेतूने हातात तलवार, पिस्तोल, लोखंडी रॉड घेऊन घरात शिरले.
यावेळी प्रकाश निकम यांनी फिर्यादी नगरसेविका पूजा सूर्यवंशी यांच्या कानशिलात मारली व तुझ्या पतीस जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली, अशी फिर्याद नगरसेविका सूर्यवंशी यांनी दिली आहे.
त्यावरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४५१/१९, भा.दं.वि. कलम ४५२, ३२३ यासह इतर कलमे व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर व घटस्थापनेच्या मुहूर्तावर ही घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.