आली कोरोनाची ‘लाट’, तिने लावली शिक्षणाची ‘वाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST2021-06-11T04:12:29+5:302021-06-11T04:12:29+5:30

डमी स्टार - ७९८ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मागीलवर्षी प्रवेश मिळाला ...

Corona's 'wave' came, she waited for education | आली कोरोनाची ‘लाट’, तिने लावली शिक्षणाची ‘वाट’

आली कोरोनाची ‘लाट’, तिने लावली शिक्षणाची ‘वाट’

डमी

स्टार - ७९८

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मागीलवर्षी प्रवेश मिळाला खरा, मात्र ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असलेली गॅझेट्स काही विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नसल्याने ते शिक्षणापासून वंचित राहिले. दरम्यान, यंदाही हीच स्थिती आहे. त्यामुळे अशा गरीब विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणासाठी साधने उपलब्ध करून देण्‍यात यावीत, अशी मागणी होत आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींनुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा या घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. या जागांवर सोडत पद्धतीने प्रवेश दिले जातात. मागीलवर्षी २८७ शाळांमधील ३५९४ जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली गेली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया आधीच विलंबाने सुरू झाली. अर्धे सत्र उलटल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, त्यात ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असलेली साधने नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने, किती विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन साधने नाहीत, अशी माहिती संकलित केली असता, त्यात जिल्ह्यातील लाखावर विद्यार्थ्यांकडून मोबाईल व इतर ऑनलाईन साधनेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.

.............

ऑनलाईन शिक्षणासाठीची साधने मिळावीत...

- मुळात मागीलवर्षी प्रवेश प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे आधीच नुकसान झाले. यातच ऑनलाईन शिक्षणासाठी साधने नसल्यामुळे शाळेत प्रवेश होऊनही त्यांना शिक्षण मिळू शकले नाही. यात काही शाळांनी समाजातील दानशूर व्यक्तींना आवाहन करून या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसा काही शाळांनी स्वत: पुढाकार घेतला.

- तरीही बहुतांश गरीब विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, तर कुणाकडे इंटरनेटची सुविधा नाही. आता दुसऱ्या लाटेमुळे काही दिवसांपूर्वी मिळालेले काम सुध्दा पालकांच्या हातातून गेले आहे. त्यामुळे घर चालविणे सुध्दा कठीण बनले आहे, परिणामी, स्मार्टफोन कोठून घेणार, असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहाेचणे गरजेचे आहे.

- गोरगरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळावे, यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी शाळा, दानशूर व्यक्ती, तसेच राजकीय व्यक्ती किंवा प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

.............

यंदा ३०६५ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया

यंदा जळगाव जिल्ह्यातील २९६ शाळांमधील ३ हजार ६५ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शुक्रवारपासून या प्रक्रियेला सुरुवात होईल. निवड यादीतील विद्यार्थ्यांना २० दिवसात प्रवेश निश्चित करावयाचे आहेत. दरम्यान, यातील बहुतांश विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन सुविधा नाही, असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

.............

काय म्हणतात पालक...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत, त्यामुळे पाल्यास ऑनलाईन शिक्षण मिळाले. मात्र, मागीलवर्षी प्रवेश प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे प्रवेशही उशिरा झाला. ग्रामीण भागात वास्तव्यास असल्यामुळे नेटवर्कची अडचण येते. शाळा कधी सुरू होतील याची प्रतीक्षा आहे.

- शालिग्राम कोळी, पालक

घरात एकच स्मार्टफोन आहे. पण, ऑनलाईन शिक्षण सकाळीच दिले जात असल्यामुळे मोबाईल हा त्या वेळेस पाल्याकडे असतो. नंतर कामाला जाताना मोबाईल सोबत नेतो. संध्याकाळी घरी आल्यानंतर मुलाकडून व्हॉट्स ॲपवर शिक्षकांनी पाठविलेला अभ्यास पूर्ण करून घेतला जातो.

- संदीप पाटील, पालक

बहुतांश मुलांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी सुविधा नाही, अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण कसे मिळेल, यासाठी शाळांनी प्रयत्न करावेत. संसर्ग कमी झाला आहे, मुले वर्षभरापासून घरात आहेत. त्यामुळे ती कंटाळली आहेत. शाळा सुरू कधी होतील याची प्रतीक्षा आहे. पण, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका दर्शविला आहे. त्यामुळे शाळा सुरू होतील का नाही, हा देखील प्रश्न आहे.

- दीपक शुक्ला, पालक

.....................

२०२१-२२ आरटीई प्रवेश स्थिती...

शाळा - २९६

राखीव जागा - ३०६५

ऑनलाईन अर्ज - ५९३९

लॉटरीत निवड - २६९५

तात्पुरता प्रवेश - ००

प्रवेश निश्चित - ००

Web Title: Corona's 'wave' came, she waited for education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.