लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या तीन ते चार दिवसांपासून सातत्याने जळगाव शहरात रुग्ण आढळून येत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या वाढली होती. मात्र, सोमवारी यात काहीसा दिलासा मिळाला. यात जिल्ह्यात सोमवारी एकही कोरोना बाधित आढळून आलेला नाही. दरम्यान, मध्यंतरी रुग्ण आढळून आलेल्या भुसावळात रुग्णसंख्या कमी झालेली आहे. आता जिल्ह्यातील चारच तालुक्यांमध्ये सक्रिय रुग्ण आहेत.
जिल्ह्यात सोमवारी आरटीपीसीआरचे ७११ अहवाल प्राप्त झाले तर अँटिजनच्या १०८४ तपासण्या झाल्या. गेल्या दोन दिवसांपासून अँटिजन तपासणीतच बाधित रुग्ण आढळून येत होते. यात शहरातच हे रुग्ण आढळून येत असल्याने चिंतेचे वातावरण होते. दरम्यान, सोमवारी जिल्ह्यातील ३ रुग्ण बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या ही २१ वर पोहोचली असून दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यात आता केवळ लक्षणे असलेला एकच रुग्ण आहे. जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण, अमळनेर, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, जामनेर, रावेर, पारोळा, चाळीसगाव, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यात एकही रुग्ण नाही.