भुसावळात कोरोना पसरतोय पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 15:00 IST2020-05-18T14:57:58+5:302020-05-18T15:00:19+5:30
शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे.

भुसावळात कोरोना पसरतोय पाय
उत्तम काळे
भुसावळ, जि.जळगाव : शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रविवारी रात्री पुन्हा एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. हा रुग्ण नवीन एरियात सापडल्यामुळे शहरात कोरोनाचा फैलाव सुरू असल्याचे दिसून येत आहे. प्रशासन मात्र कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरले असल्याचे दिसून येत आहे.
येथे रविवारी रात्री दहाला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. फालक नगर, डी. एल. हिंदी हायस्कूलमागील बाजूस राहणारा ५५ वर्षीय या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५५ झाली आहे, तर मयत रुग्णांची संख्या १० झाली आहे. नऊ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. आता ३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मयत रुग्णाच्या घरी रविवारपर्यंत भेटीला येणाऱ्यांची गर्दी दिसून आल्याचे सांगण्यात आले. रात्री दहाला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मात्र घराला कुलूप लावण्यात आले असून घरातील मंडळी कुठे गेली हे समजू शकले नाही, पालिकेतर्फे हा परिसर सील करण्याची तयारी सुरू आहे. या रुग्णाची तब्येत खराब झाल्यानंतर शहरातील दवाखाने बंद असल्यामुळे त्याने मुक्ताईनगर येथे उपचार घेतले असल्याचे सांगण्यात आले.
शहरात रविवारी सर्वपक्षीय लॉकडाऊन संपले असले तरी, शासनाचे लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये व शासनाचे आदेश तंतोतंत पाडावे, असे आवाहन आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, डीवायएसपी गजानन राठोड, जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे आदींनी केले आहे.