कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच, तातडीने करून घ्या चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST2021-07-24T04:11:58+5:302021-07-24T04:11:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सर्दी-खोकला, ताप ही लक्षणे कोरोनाची असली तरी डेंग्यूसारख्या इतर आजारांमध्येदेखील हीच लक्षणे असतात. त्यामुळे ...

कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच, तातडीने करून घ्या चाचणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सर्दी-खोकला, ताप ही लक्षणे कोरोनाची असली तरी डेंग्यूसारख्या इतर आजारांमध्येदेखील हीच लक्षणे असतात. त्यामुळे अनेक जण कोरोनाच्या शक्यतेने सुरुवातीला डेंग्यूकडे दुर्लक्ष करतात. मात्र तसे न करता ही लक्षणे दिसल्यास कोरोना, डेंग्यूसह इतर आजारांच्याही चाचण्या करून घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
जूनच्या मध्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यासोबतच घराघरांत येणाऱ्या पाण्यात अनेक विषाणू वाढले तसेच या दिवसांत अशुद्ध पाणी पिण्यात येत असल्याने अनेक आजारांची लागण होते. डासांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा प्रादुर्भावदेखील वाढतो.
कोट -
कोरोना आणि डेंग्यूची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे ही लक्षणे दिसू लागताच कोरोना अँटिजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी करावी. तसेच ती निगेटिव्ह आल्यास तातडीने डेंग्यू, मलेरिया या चाचण्या करून घ्याव्यात. कोविड निगेटिव्ह रुग्णाला नॉनकोविड म्हणून उपचार मिळत आहेत.
- डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक
सर्दी, खोकला आणि ताप
सध्याच्या काळात अनेकांना सर्दी, खोकला, ताप असा त्रास होत आहे. ही कोरोनाची लक्षणे असली तरी डेंग्यूचीदेखील हीच लक्षणे आहेत. त्यामुळे कोरोनासोबतच इतर आजारांच्या चाचण्या करण्याचा सल्ला दिला जात आहे. ताप आल्यास अनेक जण सुरुवातीला कोरोनाची रॅपिड अँटिजन किंवा आरटीपीसीआर चाचणी करतात. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्या रुग्णाला नॉन कोविड म्हणून उपचार दिले जातात. त्यात त्यांच्या डेंग्यू रॅपिडसह इतर चाचण्या केल्या जातात.
पाणी उकळून प्या, डासांपासून सावध राहा
गेल्या काही दिवसांपासून घरी नळांना येणारे पाणी शुद्ध करून किंवा उकळून पिण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
पुन्हा एकदा सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यांच्यात कोविडची लक्षणे नसली तरी इतर आजारांची लक्षणे दिसून येत आहेत.
मोकळ्या जागांमध्ये पाणी साचल्याने डासांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढू लागले आहेत.
कोरोना चाचणी - आरटीपीसीआर, रॅपिड अँटिजन
डेंग्यू चाचणी - रॅपिड डेंग्यू