जीएमसीत नियमित सेवा सुरू : कोविडनंतरच्या गुंतागुंतीसाठी दीड महिना थांबण्याचा सल्ला
डमी ११७१
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडमुळे आरेाग्याच्या विविध समस्यांबाबत एक संभ्रमावस्थेचे वातावरण गेल्या दीड वर्षांपासून आहे. त्यात आता कोरोना होऊन गेल्यानंतर अन्य आजारांच्या शस्त्रक्रिया कधी करायच्या असा एक प्रश्न काही रुग्णांना असून कोविड झाल्यानंतर फुफ्फुसांचे कार्य सुरळीत होईपर्यंत तरी रुग्णांनी थांबावे यात किमान दीड महिन्यांचा अवधी द्यावा, असे तज्ञांचे मत आहे. तोपर्यंत विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेत कोविड उपचार सुरू असल्याने दीड वर्षात अनेक नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दीड वर्षातील अधिक काळ हा कोविडचे उपचार झाल्याने नॉन कोविड यंत्रणा उपचारपद्धती बंदच होती. यात अनेक नियोजन शस्त्रक्रिया बंदच होत्या. गेल्या दोन महिन्यांपासून या ठिकाणी सुरळीत अन्य उपचारांची सेवा सुरू झाली असून नियमित सर्व शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. त्यात कोविड रुग्णांची संख्याही घटली आहे.
कोरोनाचे एकूण रुग्ण -
१४२७२४
बरे झालेले रुग्ण -
१४०१२४
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण -
२५
कोरोनाचे बळी -२५७५
दीड महिना वाट पाहा
कोरोना हा रुग्णांच्या फुफ्फुसावर परिणाम करतो. कोविडनंतर कोणतीही शस्त्रक्रिया करायची असल्यास रुग्णाचे फुफ्फुस हे सुरळीत काम करणारे हवेत. अन्यथा शस्त्रक्रियेदरम्यान भूल दिल्यानंतर गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते. अशा स्थितीत किमान दीड महिन्याचा कालावधी जाणे आवश्यक असते. त्यानंतर रुग्ण पूर्णत: स्वस्थ झाल्यानंतर शस्त्रक्रियेतील गुंतागुंत वाढत नाहीत, असे सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे यांनी सांगितले.
इमर्जन्सी शस्त्रक्रिया
पोटाला अचानक मार लागणे, ॲपेंडिक्स फुटणे, महिलांचे सिझेरियन अशा काही बाबी या इमर्जन्सी शस्त्रक्रियेत मोडतात. अशा स्थितीत रुग्णाला भूल दिल्यानंतर विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. यात रुग्णांची प्रतिकारक्षमता कमी झालेली असते. जर कोविडची लागण नसेल तर प्रतिकारक्षमात कमी झाल्याने ती होण्याची शक्यता असू शकते. आणि कोविड झाला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेणे महत्त्वाचे ठरते.
प्लान शस्त्रक्रिया
नियोजित शस्त्रक्रियांमध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, हर्निया, अपेंडिक्स, ब्रेस्ट, गर्भपिशवी अशा काही शस्त्रक्रियांचा समावेश आहे. मात्र, या शस्त्रक्रियाही अधिक काळ लांबल्यास त्रास होऊ शकतो. अशा रुग्णांनी यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असते. यात हर्नियाच्या रुग्णांची जड वस्तू उचलू नये. खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कोट
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सद्यास्थितीत सर्व शस्त्रक्रिया या नियमित सुरू आहेत. नॉन कोविड यंत्रणा पूर्ववत झालेली आहे. कोविडची लागण झालेल्या रुग्णांनी शस्त्रक्रियेसाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असते. यात नियोजित शस्त्रक्रियांसाठी काही काळ द्यावा. पूर्णत: बरे झाल्यानंतर शस्त्रक्रिया केल्या तर गुंतागुंत वाढत नाही. - डॉ. मारोती पोटे, विभागप्रमुख, सर्जरी विभाग, जीएमसी