नवीपेठ गणेश मंडळ
नवीपेठ गणेश मंडळाचे यंदाचे ४६ वे वर्ष असून, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या मंडळानेही कुुठलीही आरास न करता साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा मंडळातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात येणार असून, कोरोनापासून संरक्षणासाठी जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे. दरवर्षी मंडळांतर्फे गणेशोत्सवात विविध सामाजिक प्रबोधनाचे देखावे सादर केले जातात. मात्र, यंदा कोरोनामुळे हे सर्व देखावे रद्द करण्यात आले आहेत, तसेच श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये, म्हणून फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष म्हणून प्रमोद अग्रवाल, उपाध्यक्ष मनीष झंवर व अमोल जोशी कामकाज बघत आहेत.
श्री पंचरत्न गणेश मंडळ
नवीपेठेतील श्री पंचरत्न गणेश मंडळातर्फे यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरास रद्द करण्यात आली आहे. यंदा मंडळातर्फे गरजू विद्यार्थांना वह्या वाटप करण्यात येणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या महत्त्वाबाबतही जनजागृती करण्यात येणार आहे. मंडळाचे यंदाचे ३२ वे वर्ष असून, मंडळातर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो. स्त्रीभ्रूण हत्या, पाण्याचे महत्त्व, मतदानाची जनजागृती आदी विविध सामाजिक व धार्मिक देखाव्यांवर भर देण्यात येत असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द करून मंडळातर्फे सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. मंडळाचे अध्यक्ष म्हणून संजोग तिलकपुरे हे काम पाहत असून, उपाध्यक्ष किरण सोनवणे व कल्पेश तिलकपुरे हे काम बघत आहेत.