करार केलेली संस्थाही निघाली कागदोपत्रीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST2021-09-07T04:20:50+5:302021-09-07T04:20:50+5:30

जळगाव : नीती आयोगाच्या नावाने बनावट कागदपत्राचा वापर करून प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या नावाने जिल्ह्यातील प्रशिक्षण केंद्रांना ९४ लाख ...

The contracted organization also went through the paperwork! | करार केलेली संस्थाही निघाली कागदोपत्रीच !

करार केलेली संस्थाही निघाली कागदोपत्रीच !

जळगाव : नीती आयोगाच्या नावाने बनावट कागदपत्राचा वापर करून प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या नावाने जिल्ह्यातील प्रशिक्षण केंद्रांना ९४ लाख १४ हजार ८५३ रुपयांचा गंडा घालणाऱ्या अविनाश उर्फ अर्जुन कळमकर (रा.दैठणे गुंजाळ, ता.पारनेर, जि.अहमदनगर) याने एमसीव्हीआरटी ही संस्था केंद्र व राज्य शासनाने प्रशिक्षण देणारी भागीदारी संस्था असल्याचे करारात दाखविले असले तरी प्रत्यक्षात तसे काहीच आढळून आले नाही, ही संस्थादेखील कागदोपत्रीच असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान, कळमकर याला १० सप्टेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कळमकर याने पिंप्राळा येथील योगिता उमेश मालवी यांच्याशी केलेल्या करारात एमसीव्हीआरटी ही संस्था महाराष्ट्र संस्था अधिनियम १९६० व मुंबई संस्था नोंदणी अधिनियम १९५० या कायद्यान्वये नोंदणी असल्याचे नमूद केले आहे, प्रत्यक्षात ही संस्था कोणत्याही कायद्याने नोंदणी नसल्याचे तपासात उघड झाले आहे. या कंपनीच्या सीआरएस फंडातून कौशल्य विकास योजना राबविली जात असल्याचे त्यात म्हटले आहे. अशी कंपनीच अस्तित्वात नसल्याने सीआरएस फंडदेखील अनुज्ञेय होत नाही. त्यामुळे तीन महिन्यात अनुदानाची रक्कम देण्याचे त्याने सांगितले असले तरी दोन वर्षात एकाही प्रशिक्षण केंद्राला त्याने रक्कम दिलेली नाही.

बँक सुरू करण्यासाठी उकळले पैसे

कळमकर याने योगिता मालवी यांच्या जयश्री दादाजी फाउंडेशनअंतर्गत नोंदणी झालेल्या प्रशिक्षण केंद्र चालकांना अनुदानाची रक्कम अदा करण्यासाठी मायभुमी ग्रामविकास निधी लि. या नावाने बँक सुरू करणार असल्याचे सांगून त्यात बचत खाते उघडण्यासाठी ५०० तर करंटसाठी १ हजार रुपये या प्रमाणे १३९ केंद्र चालकांकडुन ४८ हजार ८५३ रुपये गोळा केले. मात्र ना बँक सुरू झाली ना खाते उघडले गेले. त्याशिवाय बचत गट यशश्री १९ योजनेच्या नावाखाली १७७ प्रशिक्षण केंद्राच्या मदतीने १० लोकांचा बचत गट स्थापन करून प्रत्येक गटातील सदस्याकडून १०० रुपये प्रति महिना या प्रमाणे सहा महिन्यापर्यंत पैसे जमा केले. त्यानंतर लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ६७४ बचत गट स्थापन केले. त्यांच्याकडून प्रत्येक एक हजार या प्रमाणे ६ लाख ७४ हजार रुपये व नमुना साहित्य म्हणून प्रती गट ८ हजार या प्रमाणे ५३ लाख ९२ हजार असे एकूण ६० लाख ६६ हजार रुपये जमा करून कुठलीच कारवाई केली नाही.

नोकरीला लावण्यासाठी ९ लाख घेतले

कळमकर याच्याविरुध्द पारनेर येथे फसवणुकीचा एक गुन्हा दाखल असून त्यात नोकरीचे आमिष दाखवून त्याने ९ लाख रुपये घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्याशिवाय ठाण्यातदेखील ८ महिलांना १२ लाखात गंडविल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, ज्या लोकांचे पैसे घेणे आहेत, त्यांनी त्याच्याशी वारंवार संपर्क साधला, मात्र त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. कोरोना काळात पत्नी, आई, वडील यांच्या उपचारासाठी हक्काचे पैसे मागितले तरी देखील त्याने दिले नाहीत. पोलिसांनी जप्त केलेल्या त्याच्या मोबाइलमध्ये असे संदेश आलेले आहेत.

Web Title: The contracted organization also went through the paperwork!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.