शहरातील विहिरींची चोरी करून केले बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST2021-09-02T04:36:58+5:302021-09-02T04:36:58+5:30
नाल्याचा प्रवाह बदलल्यावरही मनपाकडून कारवाई नाही लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात दिवसेंदिवस नवीन बांधकाम वाढत जात आहेत. ही ...

शहरातील विहिरींची चोरी करून केले बांधकाम
नाल्याचा प्रवाह बदलल्यावरही मनपाकडून कारवाई नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात दिवसेंदिवस नवीन बांधकाम वाढत जात आहेत. ही बांधकामे वाढत जात असताना, अनेक ठिकाणी पर्यावरणाचा कोणताही विचार होताना दिसून येत नसून, नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलवून त्याठिकाणी बांधकाम करण्याचे कामदेखील घडत आहे. शहरातील सुमारे २० हून अधिक विहिरी गायब करून, त्याठिकाणी बांधकाम करण्याचे प्रकारदेखील शहरात घडत आहेत; मात्र याबाबत मनपा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही.
शहरातील वाढीव भागात हे प्रकार अधिक घडत आहेत. मेहरुण, सावखेडा शिवार, निमखेडी, खेडी या भागासह शिवाजी नगर व जुने जळगाव गाव परिसरातील अनेक भागांमध्ये जुन्या विहिरी बंद करून त्याठिकाणी बांधकाम करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे खासगी विहिरींसोबत ज्या विहिरींवरून कधीकाळी संपूर्ण परिसरासाठी पुरवठा केला जात होता. त्या विहिरीदेखील गायब केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या भागांमध्ये घडले प्रकार
१. शहरातील शिवाजीनगर भागातदेखील एका रस्त्यालगत असलेली विहीर बंद करून, त्यावर बांधकाम केले होते. दऱम्यान, या विहिरीचा पाण्याचा वापर सार्वजनिक पुरवठ्यासाठी होत होता; मात्र खासगी जागेत असल्याचे कारण देत ही विहीर बंद करून, याठिकाणी बांधकाम करण्यात आले आहे.
२. आव्हाणे शिवार परिसरातदेखील दोन विहिरी बंद करून, त्याठिकाणी मोठे अपार्टमेंट बांधण्यात आले आहेत; मात्र या विहिरीवर बांधकाम करताना मनपाचीदेखील कोणतीही परवानगी घेतलेली नाही.
३. यासह सावखेडा शिवार असो वा निमखेडी परिसर, या भागातदेखील अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यालगतच्या विहिरीवरदेखील अतिक्रमण करून विहिरी बंद केल्या आहेत.
नाल्याचा प्रवाह बदलविला
शहरातील लेंडी नाल्याचा मुख्य नैसर्गिक प्रवाह बदलवून त्याठिकाणी बांधकाम केल्याचा प्रकार काही वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. विशेष म्हणजे याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार करूनदेखील यावर मनपाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ममुराबादकडे जाणाऱ्या नैसर्गिक प्रवाहावर भर टाकून हा प्रवाह बदलविण्यात आला आहे. भविष्यात अतिवृष्टी झाल्यास यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोट..
विहिरींवर बांधकामाबाबत तक्रारी आलेल्या नाहीत; मात्र जर अशा प्रकारचे बांधकाम होत असेल तर याबाबतचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. यासह नाल्याच्या प्रवाहाबाबतदेखील माहिती घेऊन याबाबत कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
-संतोष वाहुळे, उपायुक्त.
प्रशासनाचे दुर्लक्ष अन् राजकारण
पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत राजकारणी व प्रशासनदेखील गांभिर्याने विचार करत नसल्याचे दिसून येत आहे. मेहरूण तलाव परिसर ग्रीन झोन असताना त्याठिकाणी बांधकामांना परवानगी दिली जात आहे. नाल्याचा प्रवाह बदलविण्यात आला, तरीही यावर कारवाई नाही. हा प्रकार चुकीचा आहे.
-प्रणिलसिंह चौधरी, संचालक, योगी फाउंडेशन.
अनेक विहिरी या पाण्याचा नैसर्गिक स्रोत उत्पन्न करून देत असतात; मात्र या प्रकारे बांधकाम करताना दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच नाल्याचा प्रवाह बदलविल्यामुळेदेखील पुराचे संकट निर्माण होऊ शकते.
- सागर महाजन, संचालक, नीर फाउंडेशन.