लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील कानळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर अधिकारी वेळेवर न आल्याने सोमवारी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा लागल्यावरदेखील वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर वेळेवर न आल्यामुळे नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच नेहमीच ही समस्या निर्माण होत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली करण्याचीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कानळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण सुरू आहे. याठिकाणी कानळदा परिसरातील सुमारे ७ गावांमधील नागरिक दररोज लसीकरणासाठी येत आहेत. मात्र, सकाळी १० वाजेपर्यंत याठिकाणी एकही अधिकारी किंवा डॉक्टर देखील येत नसल्याने नागरिकांना मोठा ताटकळत उभे रहावे लागत आहे. तसेच लसीकरणासाठी कोणतीही टोकण पद्धत याठिकाणी नसल्याने नागरिकांना सकाळपासून रांगा लावाव्या लागत असतात. वेळेवर लसीकरण केंद्र सुरू होत नसल्याने सोमवारी याठिकाणी जमलेल्या नागरिकांनी तीव्र शब्दांत वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले.
लसींचेही आकडेवारी नसल्याने येते अडचण
लसीकरण केंद्रावर दररोज किती जणांचे लसीकरण होईल किंवा किती लसी उपलब्ध आहेत. याबाबतची कोणतीही माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाहीर केली जात नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रावर जवळ-जवळ दोनशेहून अधिक नागरिक रांगेत उभे असतात. ही संख्या जर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केली तर याठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळता येऊ शकते. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका नागरिकांना बसताना दिसून येत आहे. याठिकाणी टोकण पद्धत राहिल्यास नागरिकांना होत असलेला मन:स्ताप सहन करावा लागणार नाही अशी मागणी पंचायत समिती सदस्य ॲड. हर्षल चौधरी यांनी केली. तसेच वैद्यकीय अधिकारी हे निवासी असतानाही गावात राहत नसल्याने त्यांची बदली करण्याची मागणी भाजप तालुकाध्यक्ष गोपाल भंगाळे यांनी केली आहे.