ब्रेक द चेन आदेशाचा गोंधळ, व्यापारी संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:16 IST2021-04-07T04:16:24+5:302021-04-07T04:16:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ४ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार काय सुरू राहणार, काय ...

ब्रेक द चेन आदेशाचा गोंधळ, व्यापारी संभ्रमात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ४ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार काय सुरू राहणार, काय बंद राहणार याविषयी जिल्हा प्रशासनाकडून आदेश जारी होण्याची प्रतीक्षा असताना रात्री उशिरापर्यंत निर्णय होऊ शकला नाही. राज्य सरकारने ४ एप्रिलच्या आदेशात ५ रोजी पुन्हा सुधारणा केल्याने आता जिल्हास्तरावरून ६ एप्रिल रोजी आदेश काढण्यात येणार आहे. या सर्व गोंधळात व्यापारीवर्ग मात्र सकाळपासून रात्री उशिरापर्यंत संभ्रमात राहिला तरी निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, जिल्हास्तरावरून मंगळवारी निर्णय होणार असल्याने जळगावातील सुवर्णबाजार मंगळवार, ६ एप्रिल रोजी सुरू राहणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. असे असले तरी राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा ठेवायचे आदेश दिले आहे ते व्यवसाय बंद राहणार आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारच्या वतीने ४ एप्रिल रोजी विविध निर्बंध घालत ३० एप्रिलपर्यंत ब्रेक द चेन असे नाव देऊन नवीन निर्बंध लागू करण्यात आले. मात्र, या आदेशासंदर्भात सकाळपासूनच व्यापारीवर्ग संभ्रमात होता. त्यात संध्याकाळी जिल्हा प्रशासनाकडून आदेश जारी होतील, अशी अपेक्षा व्यापारीवर्गाला होती. यात संध्याकाळी कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर आदेश काढण्याची तयारी सुरू असतानाच राज्य सरकारने ४ एप्रिल रोजीच्या आदेशात सुधारणा केली.
या सेवांचा अत्यावश्यकमध्ये केला समावेश
प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवा वाढविण्यात येऊन पेट्रोलपंप, पेट्रोलियम संबंधित उत्पादने, सर्व कार्गो सेवा, डेटा सेंटर, तंत्रज्ञान संबंधित महत्त्वाच्या पायाभूत सुविधा शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा, फळविक्रेते यांचा यात समावेश करण्यात आला. या सुधारित आदेशामुळे जिल्हास्तरावरून आता मंगळवारी आदेश काढण्यात येणार आहे. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनातील आदेशाच्या गोंधळात व्यापारीवर्ग चांगलाच भरडला गेला.
रात्री साडेनऊ वाजेपर्यंत निर्णय नाही
४ एप्रिलच्या आदेशानुसार सोमवारी रात्री ८ वाजेपासून निर्बंध लागू होणार असल्याचे आदेशात म्हटले होते. हे आदेश जिल्ह्यासाठी लागू राहतील की नाही, यासाठी व्यापारी जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात येणाऱ्या आदेशाची प्रतीक्षा करीत होते. मात्र, रात्री साडेनऊ वाजेपर्यंत कोणताच निर्णय होऊ शकला नाही व राज्य सरकारने आदेशात सुधारणा केल्याने अखेर जिल्हास्तरावरील निर्णय मंगळवारवर ढकलला गेला.
आज सुवर्णबाजार सुरू
१) राज्य सरकारने काढलेल्या आदेशाचा खुलासा व्यवस्थित होत नसल्यामुळे मंगळवारी सुवर्णपेढ्या संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुल्या ठेवण्यास हरकत नाही, असे संघटनेच्या वतीने सुवर्ण व्यावसायिकांना कळविण्यात आले. यामध्ये सर्व नियमावलीचे पालन करण्यात येऊन जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशानंतर निर्णय घेण्यात येईल, असे जळगाव सराफ बाजार असोसिएशनचे अध्यक्ष अजयकुमार ललवाणी यांनी सांगितले.
२) राज्य सरकारने ४ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने मंगळवारपासून बंद राहणार असल्याचे जिल्हा व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष युसुफ मकरा यांनी सांगितले.