आमदार चिमणराव पाटील व जळगाव येथील जिल्हा विभाग नियंत्रक भगवान जगणोर यांनी पारोळा बसस्थानकाच्या रस्त्यांची व व्यावसायिकांच्या समस्यांची पाहणी केली. यावेळी बस स्थानकात सर्वांत मोठी समस्या म्हणजे आजूबाजूचा परिसर हा काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण नसल्याने पावसाळ्यात गारा उन्हाळ्यात धूळ निर्माण होत असल्याने याचा व्यावसायिकांना त्रास होत होता. याबाबत येथील व्यावसायिकांनी आमदार व महामंडळ यांच्या अधिकाऱ्याकडे समस्यांचा पाढा वाचला.
यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले की, शासनाकडे नुसते प्रस्ताव पाठवून चालणार नाही तर त्याचा पाठपुरावा करावा लागतो. आपण या गोष्टी न केल्यानेच हा प्रश्न प्रलंबित आहे. उद्यापासून यासाठी येणाऱ्या अडीअडचणी त्रुटी बाजूला काढून लवकरात लवकर मला कळवा. या गोष्टीचा मी पाठपुरावा करून शासनाकडे बस स्थानकाला काँक्रिटीकरण लवकरात लवकर मंजूर करून आणू, असे सांगितले.
यावेळी महामंडळाचे अभियंता नीलेश पाटील, पारोळा व्यवस्थापक भानुदास वाघ, युवासेना शहरप्रमुख आबा महाजन, दुकानदार, राकेश शिंदे, प्रवीण जगताप, अस्लम खाटीक, जितू सिंधी, शिवाजी चौधरी, राहुल महाजन, बापू भावसार, पवन चौधरी उपस्थित होते.