लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा रुग्णालयाने बाजाराभावापेक्षा अव्वाच्या सव्वा दराने खरेदी केलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तक्रार प्रकरणात आता चौकशी समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. आता आठवडाभरात याचा चौकशी अहवाल मागविला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे. दरम्यान,या प्रकरणातील तक्रारदार दिनेश भोळे यांनी मात्र, महिना उलटूनही कारवाई होत नसल्याने संबंधित दोषी अधिकाऱ्यांना पाठिशी घातले जात असल्याचा आरोप केला आहे.
जिल्हा रुग्णालयाने प्रभंजन ऑटोमोबाईलकडून सव्वा लाखाला एक असे १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी केले होते. विविध ग्रामीण रुग्णालयात ते देण्यात आले आहेत. मात्र, या कॉन्सन्ट्रेटरची किंमत बाजारात २५ हजारांपर्यंत असल्याने हे अव्वाच्या सव्वा दराने खरेदी झाल्याची तक्रार दिनेश भोळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली होती. त्यानंतर डॉ.तासखेडकर व डॉ.वृषाली सरोदे यांच्याकडे ही चौकशी देण्यात आली होती. मात्र, त्यातच डॉ. तासखेडकर यांची औरंगाबाद येथे बदली होऊन त्यांना तडकाफडकी कार्यमुक्ती करण्यात आले होते. त्यानंतर मात्र, ही चौकशी थंडबस्त्यात आली होती.
चौकशी कुणाकडे?
मोहाडी रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ. सुशांत सुपे व एनआरएचएमचे कर्मचारी इलियाज शेख यांच्याकडे आता ही चौकशी सोपविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना तांत्रिक बाबी तपासायच्या आहेत. मात्र अद्याप त्यांना पत्र मिळाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मेमोग्राफी मशीनची चौकशी व्हावी
चोपडा येथे जिल्हा रुग्णालयाकडून खरेदी करण्यात आलेल्या मेमोग्राफी मशीनसह इतर साहित्याची चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले आहे. या खरेदीत गैरव्यवहार झाला असून गरज नसताना ही खरेदी झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.