नैसर्गिक जलाशयात विसर्जन न करण्याचे आवाहन :
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तुरटीच्या गणपती मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलाशयात केल्यास त्या जलाशयातील जैवविविधता धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळे तुरटीच्या मूर्ती न घेण्याचे आवाहन वन्यजीव संरक्षण संस्थेच्यावतीने करण्यात आले होते. या आवाहनाला साथ देत शहरात केवळ एक हजार तुरटीच्या गणपती मूर्तींची विक्री झाली असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेकडून देण्यात आली आहे.
शहरात तुरटीपासून निर्मित सुमारे सहा हजार गणेश मूर्ती विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या. या मूर्ती न घेण्याबाबत वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे जनजागृती अभियान चालविले होते. तसेच मूर्ती विकत घ्या, मात्र त्या मूर्ती तलावात विसर्जन न करता घरीच विसर्जन करा या आवाहनाला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. संस्थेच्या आवाहनास संमिश्र प्रतिसाद देत अनेक नागरिकांनी आम्ही तुरटी मूर्ती खरेदी केल्या नाहीत असे संस्थेस संपर्क साधून कळविले, तर आम्ही मूर्ती खरेदी केल्या, पण तलावात विसर्जन करणार नाही असे काही नागरिकांनी सांगितले. ज्या नागरिकांनी या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत त्यांनी या मूर्ती मनपा मूर्ती संकलन केंद्रावर दान कराव्या किंवा घरीच विसर्जन करावे, असे आवाहन वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, सचिव योगेश गालफाडे, राहुल सोनवणे, गौरव शिंदे यांनी केले आहे.