जातीयवाद गुंडगिरी, शेतकऱ्यांना छळणारी सावकारी मोडीत काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:22 IST2021-09-07T04:22:07+5:302021-09-07T04:22:07+5:30
सुनील पाटील जळगाव : समाजासाठी घातक ठरणारे जातीयवादी गुंड व त्यांना खतपाणी घालणाऱ्यांचे रेकॉर्ड काढायला सुरुवात झाली असून त्यासाठी ...

जातीयवाद गुंडगिरी, शेतकऱ्यांना छळणारी सावकारी मोडीत काढणार
सुनील पाटील
जळगाव : समाजासाठी घातक ठरणारे जातीयवादी गुंड व त्यांना खतपाणी घालणाऱ्यांचे रेकॉर्ड काढायला सुरुवात झाली असून त्यासाठी एक आराखडाच तयार केला. त्याशिवाय देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना छळणारे सावकार यांचाही बंदोबस्त केला जाणार आहे. जनतेला विश्वास वाटावा अशी पोलिसींग आपल्याला अपेक्षित आहे, त्यादृष्टीनेच आपण काम करणार असल्याचे स्पष्ट मत नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.
नाशिक परिक्षेत्राचा पदभार घेतल्यानंतर शेखर पहिल्यांदात खान्देश दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संवाद साधला असता आपली कार्यपद्धत व जळगावला पूर्वी केलेल्या कामाचे अनुभव याबाबत त्यांनी मनमोकळी चर्चा केली. गुन्हेगारांना गुन्हेगारासारखेच वागविले जाऊन त्यांना त्यांची जागा दाखवितानाच सज्जनांना सॅल्यूट असेल. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात अवैध सावकारी व शस्त्र तस्करीचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या दोन बाबींवर पोलीस दलाची विशेष नजर असणार आहे. गणेशोत्सव काळात आम्ही शांततेचे आवाहन केले आहे. मात्र त्याला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर गाठ पोलीस दलाशी आहे, हे देखील कोणी विसरू नये असा इशारा देखील त्यांनी समाजकंटकांना दिला आहे. अशा लोकांचे पूर्वीचे रेकॉर्ड बघून याद्या तयार केल्या जात असून गुप्त पाळतही ठेवली जात आहे. शांतता व मोहल्ला समितीच्या बैठकांमधून हाच संदेश दिला जात आहे.
भुसावळात पकडला होता मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी व शस्त्रसाठा
मुंबईमध्ये १९९३ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. तेव्हा त्यातील आरोपी मुंबईच्या बाहेर पळाले होती. त्यावेळी आपण जळगावात कार्यरत होतो. या बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपी टायगर मेमन याचा उजवा हात समजला जाणारा व दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी शहा नवाज हा मुंबईतून थेट भुसावळात आल्याची माहिती मिळाली होती. अतिशय नियोजनबद्ध पध्दतीने आपण स्वत: त्याला अटक केली होती. त्याच्याकडून मोठी हत्यारे, आरडीएक्स, ब्राऊन शुगरचा साठा जप्त करण्यात आला होता. याच काळात काश्मिरी अतिरेक्यांनाही येथे अटक करण्यात आली होती. अगदी स्थानिक ते राष्ट्रीय अतिरेक्यापर्यंतच्या गुन्हेगारांशी संपर्क आला. त्यांना त्यांची जागा दाखविता आल्याचे आजही समाधान आहे. याच कामगिरीच्या बळावर मोठ्या गुन्ह्यांच्या तपासाची संधी मिळत गेली. अगदी सुरुवातीपासूनच कायद्याच्या चाकोरीत काम करीत असल्याचे शेखर यांनी सांगितले.
पोलीस दलातील अंतर्गत राजकारण खपवून घेणार नाही
पोलीस दलातील अंतर्गत राजकारणावर छेडले असता, बी.जी.शेखर म्हणाले, या प्रकरणाचे अजिबात समर्थन करणार नाही. असा प्रकार होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. संबंधिताविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. प्रत्येकाने आपापले काम केले पाहिजे. त्यामुळे गुन्ह्यांना आळा बसेल. जनतेला विश्वास वाटावा अशी कामगिरी पोलिसांनी करणे अपेक्षित आहे.