सहा रस्त्यांवरील अतिक्रमण कारवाईस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:20 IST2021-09-22T04:20:02+5:302021-09-22T04:20:02+5:30

फोटो : २२सीटीआर ४३, ४१ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केलेल्या २० किमीच्या ६ रस्त्यांवरील ...

Commencement of encroachment action on six roads | सहा रस्त्यांवरील अतिक्रमण कारवाईस सुरुवात

सहा रस्त्यांवरील अतिक्रमण कारवाईस सुरुवात

फोटो : २२सीटीआर ४३, ४१

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केलेल्या २० किमीच्या ६ रस्त्यांवरील अतिक्रमण कारवाईस मनपाकडून मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली. मंगळवारी कानळदा रोडवरील अतिक्रमणासह इच्छादेवी चौक ते शिरसोली नाक्यादरम्यानचे किरकोळ अतिक्रमण काढण्यात आले. या रस्त्यांवर पक्के बांधकाम असलेल्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्यास मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. हे अतिक्रमण न काढल्यास मनपाकडून सर्व अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात येणार आहे.

शहरातील मुख्य ६ रस्त्यांवरील विकासकामांना प्राधान्य दिले जाणार आहे. मनपाकडून बांधकाम विभागाकडे वर्ग झालेल्या रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. बांधकाम विभागाने या रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याचा सूचनेनंतर मनपा प्रशासनाकडून मंगळवारपासून अतिक्रमण कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. मनपाकडून तीन दिवसांत हे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. अतिक्रमण काढल्यानंतर महिनाभराच्या आत या रस्त्यांचा कामांना सुरुवात करण्यावर भर दिला जाणार आहे.

महिनाभराच्या आत रस्त्यांचा दुरुस्तीसाठी प्रयत्न

महापालिकेकडून हे रस्ते बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्यानंतर लवकरात लवकर हे रस्ते डांबर व खडीची एक लेन टाकून दुरुस्त करण्याचा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत. त्यानुसार डीपीडीसीकडून ३ कोटींचा निधी बांधकाम विभागाला प्राप्त होणार आहे. लवकरच शॉर्ट निविदा काढून मुख्य रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली जाणार आहे.

या भागातील काढण्यात आले अतिक्रमण

१. मनपाकडून मंगळवारी दुपारी उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण कारवाईस सुरुवात करण्यात आली. दुपारी १ वाजता शिवाजीनगर भागातील अंबिका सॉ मिल ते कानळदा नाक्यापर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले.

२. दुपारून इच्छादेवी चौक ते शिरसोली नाक्यावरील किरकोळ अतिक्रमणदेखील काढण्यात आले. कारवाईदरम्यान नागरिकांनी याबाबत सूचना दिल्या नसल्याचे सांगितले. मात्र, गेल्याच आठवड्यात मनपाकडून संबधितांना नोटिसा बजाविण्यात आल्याचे मनपा कर्मचाऱ्यांनी सांगितले.

कारवाईदरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त

इच्छादेवी चौक ते शिरसोली नाक्यादरम्यानचे किरकोळ अतिक्रमण मनपाने काढले असले तरी पक्के बांधकाम मंगळवारी काढण्यात आले नाही. मनपाने संबंधित अतिक्रमणधारकांना बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंतची मुदत दिली असून, हे अतिक्रमण न काढल्यास मनपाकडून कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, याठिकाणी कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून मनपाकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनपाने रस्त्याची मोजणी करून मार्कींग केली आहे. त्यानुसार अतिक्रमण विभागाच्या पथकांनी प्रत्येक अतिक्रमणधारकाच्या जागेसमोर जाऊन व्हिडिओे चित्रणात सूचना दिल्या. यात गटारीपासून सात फुटांपर्यंत आतमध्ये अतिक्रमण काढावे लागणार आहे. यात अनेकांची व्यावसायिक दुकाने असल्याने साहित्य काढून नुकसान टाळण्यासाठी त्यांना मुदत देण्यात आली.

Web Title: Commencement of encroachment action on six roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.