अपघाती क्षेत्रांची माहिती संकलीत करुन आवश्यक उपाययोजना तातडीने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 18:33 IST2021-01-28T18:33:26+5:302021-01-28T18:33:26+5:30
खासदार रक्षा खडसे

अपघाती क्षेत्रांची माहिती संकलीत करुन आवश्यक उपाययोजना तातडीने करा
जळगाव - जिल्ह्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी अपघाती क्षेत्रांची माहिती संकलीत करुन त्याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. असे निर्देश खासदार रक्षाताई खडसे यांनी आज दिलेत.
येथील जिल्हा नियोजन भवनात संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार श्रीमती खडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आदि उपस्थित होते.
खासदार खडसे पुढे म्हणाल्या की, सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महामार्गाची कामे सुरु आहे. त्यामुळे वाहनचालकांना मार्गदर्शक ठरतील असे सुचनाफलक ठिकठिकाणी लावावे. ज्याठिकाणी वारंवार अपघात होतात अशा ठिकाणांची माहिती तातडीने संकलीत करुन तेथे आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात. घोडसगाव येथे सर्व्हिसरोड तयार करण्याच्या सुचना देऊन महामार्गाच्या कामांची गती वाढविण्याचेही निर्देश दिलेत. बहुतांश अपघात हे वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्याचे गांर्भीर्य लक्षात न घेतल्याने होत असतात. यात दुचाकी धारकांची संख्या जास्त असल्याने दुचाकीला साईड मिरर आवश्यक करावा, यंत्रणांनी वाहतुक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. यावेळी श्रीमती खडसे यांनी जळगाव-चिखली, जळगाव-धुळे, जळगाव-औरंगाबाद, बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची सद्यस्थितीचा माहिती सर्व संबंधित यंत्रणांकडून जाणून घेतली.