मुक्ताईनगर, (जळगाव): मुक्ताईनगर तालुक्यात मंगळवारी सकाळी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सकाळी ७ ते १० या तीन तासांच्या मुसळधार पावसाने गोरक्षगंगा नदीच्या काठावरील सुमारे पंधरा गावांना पुराचा मोठा फटका बसला. अनेक लहान-मोठ्या नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी गावांमध्ये शिरले.
पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसून जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. कुऱ्हा येथील बाजारपेठेतही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. या अचानक आलेल्या पावसाने शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून, अनेक शेतजमिनी खरडून गेल्या आहेत.
या नैसर्गिक आपत्तीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. काकोडा येथील २७ वर्षीय किरण मधुकर सावळे हा युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे यांनी तात्काळ कुऱ्हा गावाकडे धाव घेतली. मात्र, धामणगाव-देशकुंडा जवळील नाल्याला पूर आल्याने त्यांचाही मार्ग थांबला आणि ते तिथेच अडकून पडले. प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु सततच्या पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. या पावसाने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.