जळगाव आगारातील एसटी अन् बसस्थानके चकाचक करा; महामंडळाचे परिपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2023 18:51 IST2023-09-23T18:49:52+5:302023-09-23T18:51:40+5:30
एसटी महामंडळाकडून आलेल्या परिपत्रकानुसार जळगाव एसटी विभाग नियंत्रकांनी सर्व आगार प्रमुखांना आदेश काढून बसस्थानक तसेच एसटी बस स्वच्छ ठेवण्याच्या सूचना दिल्या आहे.

जळगाव आगारातील एसटी अन् बसस्थानके चकाचक करा; महामंडळाचे परिपत्रक
भूषण श्रीखंडे, जळगाव :एसटी बस आणि बसस्थानक स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान सुरू करण्यात आली आहे. मात्र एसटी बसमध्ये अस्वच्छता दिसत असल्याने राज्यभरात ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीपासून दुसऱ्या टप्यातील तपासणी मोहीमला सुरवात होणार आहे. एसटी महामंडळाकडून आलेल्या परिपत्रकानुसार जळगाव एसटी विभाग नियंत्रकांनी सर्व आगार प्रमुखांना आदेश काढून बसस्थानक तसेच एसटी बस स्वच्छ ठेवण्याच्या सूचना दिल्या आहे.
एस. टी. महामंडळाकडून राज्यातील ३१ विभागातील ५६० बसस्थानकात बस व बसस्थानकांची स्वच्छता तपासणी मोहिम ऑक्टोबर महिन्यापासून केली जाणार आहे. याबाबत एसटी बस अस्वच्छ आढळल्यास आगार प्रमुखाला ५०० रुपये दंड केला जाणार आहे. तसेच बसस्थानकातील स्वच्छेतबाबत यात गुण असणार आहे. ३ ते १४ ऑक्टोबर दरम्यान दुसऱ्या टप्यातील ही मोहिम राबविली जाणार आहे. त्यानुसार जळगाव एसटी विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सर्व आगार प्रमुखांना या स्वच्छता मोहीम नुसार बसस्थानक व आगारातील एसटी बस या स्वच्छ ठेवण्याबाबत आदेश काढले आहे.
धुळे विभागातील समिती जळगावची तपासणी करणार
जळगाव एसटी विभागातील बसस्थानकांची तपासणीसाठी धुळे एसटी विभागातील मुल्याकंन समिती येणार आहे. ही समिती जळगाव जिल्ह्यातील २० बसस्थानकांची तपासणी करून अहवाल एसटी महामंडळाला देणार आहे.
जळगावची समिती बुलढाण्यात करणार तपासणी
बसस्थानक व एसटी स्वच्छता तपासणीसाठी जळगाव एसटी विभागाची मुल्याकंन समितीला बुलढाणा जिल्ह्यातील बसस्थानकांची तपासणी करणार आहे. बुलढाण्यातील १४ बस स्थानकांची व एसटी बस मधील स्वच्छतेची तपासणी करणार आहे.