प्रशासनाच्या मदतीची वाट न बघता नागरिकांनी स्वतः कुटुंबाची खबरदारी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:16 IST2021-05-09T04:16:28+5:302021-05-09T04:16:28+5:30

फोटो.... चर्चेतील व्यक्तींशी थेट संवाद लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे‌. त्यामुळे ...

Citizens should take care of their families without waiting for the help of the administration | प्रशासनाच्या मदतीची वाट न बघता नागरिकांनी स्वतः कुटुंबाची खबरदारी घ्यावी

प्रशासनाच्या मदतीची वाट न बघता नागरिकांनी स्वतः कुटुंबाची खबरदारी घ्यावी

फोटो....

चर्चेतील व्यक्तींशी थेट संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे‌. त्यामुळे त्याचे गांभीर्य, दु:ख किती व काय आहे, हे तेच कुटुंब सांगू शकते. प्रशासन एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच मदत करणार आहे, त्यामुळे नागरिकांनीच स्वत: व कुटुंबाची खबरदारी घ्यावी व मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून केलेले आहे.

प्रश्न : पोलीस दलात कोरोनाची काय स्थिती आहे?

डॉ. मुंढे : दुसऱ्या लाटेत १९ अधिकारी व १८४ अंमलदार यांना कोरोनाची लागण झाली तर एकाचा मृत्यू झालेला आहे. यापैकी फक्त चार जण सध्या उपचार घेत आहेत. उर्वरित सर्व जण कोरोनामुक्त होऊन घरी परत गेले असून कर्तव्यावर हजर झालेले आहेत.

प्रश्न : पोलीस दलात लसीकरणाचे प्रमाण कसे आहे व त्याचा काय परिणाम झाला?

डॉ. मुंढे : एकूण ३२२३ पैकी तीन हजारांच्या वर अंमलदारांनी पहिला डोस घेतला आहे. त्याशिवाय १९६ पैकी १८३ अधिकाऱ्यांनीही पहिला डोस घेतलेला आहे. जवळपास ९५ टक्के लसीकरण पहिल्या टप्प्यात झालेले आहे. दुसरा डोसही ७० टक्के जणांनी घेतलेला आहे. गरोदर महिला व इतर अडचणी असलेले कर्मचारी फक्त राहिलेले आहेत. या लसीकरणाचा फायदा असा झाला की, कुटुंबात कोरोनाबाधित व्यक्ती असतानाही अंमलदाराला त्याची लागण झालेली नाही. जे बाधित झाले, त्यापैकी यावेळी एकालाही ऑक्सिजनची गरज भासली नाही, हे लसीकरणाचे फायदे आहेत.

प्रश्न : रुग्णाच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलमध्ये तणावाच्या घटना वाढलेल्या आहेत?

डॉ. मुंढे : हो हे खरं आहे. गेल्या आठवड्यातच शहरात अशा काही घटना घडल्या. एखाद्या रुग्णाचा मृत्यू व वाद होऊ शकतो याचा अंदाज हॉस्पिटल प्रशासनाला आलेला असतो. त्यामुळे संभाव्य घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आधीच पोलिसांना कळविणे अपेक्षित आहे. याबाबत आपण या संघटनेला पत्र देणार आहोत. जेणेकरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. रुग्णाच्या नातेवाइकांचे देखील योग्य वेळी समुपदेशन करणे शक्य होईल.

प्रश्न : कोरोना, लसीकरण बंदोबस्त व तपास यामुळे होणारी कसरत याबाबत काय सांगाल?

डॉ. मुंढे : संचारबंदी व जमावबंदी यामुळे सकाळ, संध्याकाळ पोलीस बंदोबस्ताचे फिक्‍स पॉइंट लावण्यात आलेले आहेत. त्याशिवाय लसीकरण केंद्रावर होणारा गोंधळ लक्षात घेता, तेथेही पोलिसांना पाचारण केले जात आहे. त्यामुळे पोलिसांची प्रचंड कसरत होत आहे. गुन्ह्यांचा तपास व गुन्हे घडू नये यासाठी नेहमी गस्त करावीच लागत आहे, त्यातून सुटका नाहीच. परिस्थितीच अशी ओढवली आहे की त्या ठिकाणी पोलिसांना अहोरात्र काम करावे लागत आहे.

कोट...

सध्या कोरोना हे एकमेव संकट आपणा सर्वांवर उभे ठाकले आहे. त्यामुळे त्याच्याशी सामना करताना प्रत्येक नागरिकाने स्वतः व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणे अपेक्षित आहे. शेवटी प्रशासन नियम तयार करते. त्याची अंमलबजावणी केली जाते. मात्र त्यालाही विशिष्ट मर्यादा आहेत. त्याही पुढे जाऊन आपले कुटुंब महत्त्वाचे हेच प्रत्येकाने लक्षात घ्यावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे.

- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक

Web Title: Citizens should take care of their families without waiting for the help of the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.