चोरवडच्या श्रमदानाला दातृत्वाचा पाझर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 21:17 IST2018-04-28T21:17:57+5:302018-04-28T21:17:57+5:30
सुरतेतील छोटूभाई पाटील यांची ‘गाव’प्रेमातून पाणी फाऊंडेशनला आर्थिक मदत

चोरवडच्या श्रमदानाला दातृत्वाचा पाझर!
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२८ : सुरतेत सामाजिक कार्याचा गाडा हाकत असताना गावकीच्या प्रेमाने चिंब भिजलेल्या छोटूभाई पाटील यांनी चोरवड ता.पारोळा या त्यांच्या मूळगावी दोन तास श्रमदान केले. याउपर त्यांनी पाणी फाऊंडेशनला ५१ हजारांची आर्थिक मदत देत सिंचन उपक्रमांना बळ दिले.
कागदावरच ओलिताखाली असलेल्या चोरवड शिवारात सिंचन प्रकल्पांचा नितांत गरज आहे. त्यासाठी सुरत भाजपाचे उपाध्यक्ष छोटूभाई पाटील आणि त्यांच्या पत्नी व सुरत येथील नगरसेविका रोहिणी पाटील यांनी ‘गाव’प्रेमातून पुढाकार घेत गेल्या महिन्यात महाराष्टÑाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. शासन दरबारी पाठपुरावा सुरु असताना दि.२८ रोजी पाटील दाम्पत्याने पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून चोरवड गावात सुरु असलेल्या श्रमदानात सहभाग घेतला.
चोरवड ग्रामस्थांच्यावतीने जि.प.सदस्य डॉ.हर्षल माने यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पाटील दाम्पत्याने दोन तास श्रमदान केले.
त्यानंतर छोटूभाई पाटील यांनी श्रमदान कार्यासाठी ५१ हजारांची मदत केली.तसेच श्रमदानासाठी लागणाऱ्या साहित्यही त्यांनी उपलब्ध करुन दिले. ‘श्रमदानातून मेहनत आणि मेहनतीतून सिंचन’ या उपक्रमासाठी चोरवड गाव एकवटले आहे. परप्रांतात समाजकार्याचा गाडा हाकत असतानाही गावकीच्या नात्यातून पाटील दाम्पत्याने श्रमदानात घेतलेला सहभागाविषयी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.