शिक्षण सोडून निवडला दुचाकी चोरीचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:21 IST2021-09-10T04:21:51+5:302021-09-10T04:21:51+5:30
जळगाव : कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने सर्वत्र ऑनलाइन शिक्षण सुरू आहे, मात्र शहापूर, ता.पाचोरा येथील दोन महाविद्यालयीन विद्यार्थी ...

शिक्षण सोडून निवडला दुचाकी चोरीचा मार्ग
जळगाव : कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने सर्वत्र ऑनलाइन शिक्षण सुरू आहे, मात्र शहापूर, ता.पाचोरा येथील दोन महाविद्यालयीन विद्यार्थी हे शिक्षण सोडून दुचाकी चोरीचा मार्ग निवडला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दीपक सुनील खरे (वय २२) याला अटक केली आहे, तर शुभम राजेंद्र परदेशी (वय २३) हा पोलिसांचा सुगावा लागल्याने गावातून पळून गेला. दीपक याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पाचोरा तालुक्यातील शहापूर येथील काही विद्यार्थी शिक्षण सोडून रोज पैशांची उधळपट्टी करून मौजमस्ती करीत आहेत, विशेष म्हणजे ते कोणताच कामधंदा करीत नाहीत. दुचाकी चोरीचा संशय काही जणांनी व्यक्त केल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पडताळणी करण्यासाठी हवालदार सुनील दामोदरे, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, सचिन महाजन, अशोक पाटील व मुरलीधर बारी यांचे पथक रवाना केले होते. या पथकाने आधी दोघांची माहिती काढली असता काही दिवसांपूर्वी त्यांनी ग्रामीण भागात तीन दुचाकी चोरी करून पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोडून दिल्याचे समजले. या पथकाने सर्वात आधी दीपक खरे याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता दुचाकी चोरीची कबुली देतानाच शुभमला सोबत घेऊन दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. पथक दीपकला घेऊन शुभमकडे जाणार तितक्यात तो पसार झाला.
याआधी चोरल्या दहा दुचाकी
दरम्यान, या दोघांनी मिळून याआधी दहा दुचाकी चोरी केलेल्या आहेत. सात दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या होत्या, तर तीन दुचाकी पोलीस ठाणे परिसरात लावून पसार झाले होते, आता पुन्हा तीन दुचाकी मिळून आल्या. आतापर्यंत दोघांनी तब्बल १३ दुचाकी चोरल्या आहेत. कमी किमतीत या दुचाकी विक्री करून त्या पैशात मौजमस्ती करण्याचा धंदाच त्यांनी सुरू केला होता. एक महिन्याने कागदपत्रे आणून देतो, असे ते सांगत होते. दरम्यान, अटकेतील दीपक खरे याला पहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.