कोरोना काळात बालविवाहांचे प्रमाण वाढले ; विद्यार्थींनींच्या गळ्यात मंगळसुत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:12 IST2021-07-18T04:12:39+5:302021-07-18T04:12:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या काळात अनेक मुलींचे कमी वयातच किंवा शिक्षण अर्धवट सोडून विवाह केले जात ...

कोरोना काळात बालविवाहांचे प्रमाण वाढले ; विद्यार्थींनींच्या गळ्यात मंगळसुत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या काळात अनेक मुलींचे कमी वयातच किंवा शिक्षण अर्धवट सोडून विवाह केले जात आहेत. मुली दहावी किंवा बारावी झाल्या की लगेच त्यांच्या विवाहाची तयारी केली जाते. त्यामुळे अनेक मुलींच्या गळ्यात शाळेनंतर लगेचच मंगळसुत्र पडत आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे. चोपडा, यावल तालुक्यातील आदिवासी भागात तर याबाबतचे कसलेच नियम पाळले जात नाहीत.
जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाने गेल्या काही काळात सहा तक्रारींच्या दृष्टीने बालविवाह रोखले आहेत. मात्र ज्या तक्रारी आलेल्या नाहीत. ते बालविवाह कुणीही रोखु शकले नाहीत. कोरोनाच्या काळात शाळा बंद झाल्या. मुलींचे शिक्षण थांबले. त्यांना घर सांभाळावे लागते. किंवा बाहेर कामाला जावे लागते. त्यात अनेक कुटुंबांमध्ये कमावणारी व्यक्ती एकच असते. त्या आर्थिक विवंचनेतून देखील अल्प उत्पन्न गटात मुलींचे लग्न लवकर केले जात आहे. प्रशासनाने पोलीस पाटील, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने मोहीम राबवुन हे विवाह रोखण्याची गरज आहे.
पटसंख्या कमी झालेल्या मुली गेल्या कुठे?
जिल्ह्यात बहुतांश शाळा गेल्या वर्षभरापासून बंद आहे. मधला काही काळ आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या होत्या. आता पुन्हा या वर्गांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र त्यातही मुलींची शाळेतील उपस्थिती कमी आहे. त्यामुळे या मुली गेल्या कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विद्यार्थींनींच्या गळ्यात मंगळसुत्र
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी सांगितले की, जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण फारसे नाही, असे असले तरी प्रशासनाकडे आलेल्या तक्रारीव्यतिरिक्त अनेक बालविवाह होत असल्याचे निरीक्षण लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी नोंदविले आहे. शाळा बंद झाल्यानंतर बहुतांश मुलींची लग्ने लावुन दिली गेली आहेत.
आर्थिक विवंचनेचे मोठे कारण
कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे भविष्यात मुलीचे लग्न कसे होईल, याचा विचार करून अनेकांनी लवकरात लवकर वयात न आलेल्या मुलींचे लग्न लावुन दिले आहे. ग्रामीण भागापेक्षा आदिवासी भागात याचे प्रमाण जास्त आहे.
कोट -
जिल्ह्यात बालविवाहाचे फारसे प्रमाण वाढलेले नाही. मागील काळात सहा विवाह रोखण्यात आले होते. कोरोना काळात देखील अशा घटना फारशा समोर आलेल्या नाहीत. - विजयसिंग परदेशी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी
----
रोजगार नसल्याने तसेच कमवणारी व्यक्ती एकच असल्याने मुलींची लग्न लवकर करून दिले जात आहे. त्यातच शाळा बंद असल्याने बालविवाहांचे प्रमाण वाढले. ज्यांच्या तक्रारी आल्या ते कमी असले तरी तक्रारी न येता विवाह झालेले असंख्य आहेत. या मुलींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी प्रशासन आणि सर्वांनी सामुदायिक प्रयत्न करावे - प्रतिभा शिंदे, समाजसेविका
जिल्ह्यातील एकुण शाळा ७०८
शाळा सुरू- ३०६
एकुण विद्यार्थी १,६८,६७०
एकुण हजेरी - २५०००