Changing feelings of hatred awakens humanity | द्वेषाची भावना बदलून माणुसकीचा ध्यास जागविते गझल

द्वेषाची भावना बदलून माणुसकीचा ध्यास जागविते गझल

जळगाव : स्पर्धा व हेव्यादाव्याच्या या युगात एकमेकांविषयीची द्वेषभावना बदलून माणुसकीचा ध्यास जागविण्याची ताकद गझलमध्ये असून हीच गझल जगण्याचा श्वास आणि विश्वासही आहे, असे स्पष्ट मत मराठी गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी ‘लोकमत’ शहर कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान व्यक्त केले.
‘लोकमत’च्या शहर कार्यालयाला भीमराव पांचाळे यांनी नुकतीच सदीच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी गझलचा प्रवास व संगीतातील स्थित्यंतराविषयी मनमोकळ््या गप्पा मारल्या. या वेळी त्यांच्याशी झालेला हा संवाद....
गझल काळजाची भाषा
पूर्वीपासूनच विविध प्रकारचे गायन, संगीत आपल्याकडे आहे व त्यात दिवसेंदिवस बदल होत वेगवेगळे स्थित्यंतरे आली आणि ती येत राहणार असे पांचाळे म्हणाले. मात्र यात शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या गझलचे स्थान आजही रसिकांच्या मनात कायम आणि अढळ असल्याचा विश्वास पांचाळे यांनी व्यक्त केला. त्याला कारण आहे ते काळजाची भाषा गझलद्वारे व्यक्त होते. गझल ही या हृदयापासून उसळून त्या हृदयापर्यंत कोसळते म्हणून तिला दाद मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या संवादादरम्यान त्यांनी वेगवेगळ््या पंक्ती सादर करीत शेवटी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे काय असतो ते त्यांनी ‘पाहिले दु:ख मी तुझे जेव्हा, दु:ख माझे लहानसे झाले...’ या ओळीतून सांगून टाकले.
यशाचे गीत आजही तोंडपाठ
भीमराव पांचाळे यांच्या आयुष्यात बदल घडविला तो सुरेश भट यांच्या गायनानेच. या विषयी पांचाळे यांनी सांगितले की, सुरेश भट यांचे गायन ऐकत असताना एकावेळी त्यांनी सादर केलेल्या
‘जगत मी असा आलो की, मी जसा जगलोच नाही; एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही.....’
‘कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो, पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही....’
या ओळींनी माझ्या आयुष्यात साक्षात बदल घडविला, असे पांचाळे यांनी सांगत रसिकता काय असते हे देखील भट यांच्या मैफीलीतून शिकलो आणि गायनाचा ध्यास घेतल्याचे ते म्हणाले. त्यानंतर भट यांची प्रत्यक्ष भेट झाली व त्यांचे प्रत्यक्ष सान्निध्य मला लाभत गेल्याचे ते म्हणाले.
शास्त्रीय गायन ते गझलचा प्रवास
मुळात शास्त्रीय गायन शिकलेले भीमराव पांचाळे यांच्यावर पगडा पडला तो गझलचा. त्यामुळे पांचाळे यांचे दोन्ही गुरु त्यांच्यावर नाराज झाल्याचेही त्यांनी सांगितले. या विषयी पांचाळे म्हणाले की, किराणा घराणे व पातियाळा घराण्याचे पंडित भैयासाहेब देशपांडे व एकनाथपंत कुलकर्णी हे दोन गुरु असून त्या दोघांनाही वाटायचे मी शास्त्रीय गायन करावे. मात्र गझलने अशी भुरळ घातली की मी गझलकार झालो. यात माझे अदृष्य गुरु आहे ते मेहंदी हसन. असेही ते म्हणाले. मात्र दृष्ट राजकारणाने (भारत-पाकिस्तान वादामुळे) त्यांच्याशी कधी भेट होऊ शकली नाही, अशीही खंत पांचाळे यांनी व्यक्त केली.
शास्त्रीय गायन शिकल्यानंतर आकाशवाणीवर मेहंदी हसन यांची गझल ऐकली आणि काय करावे आणि काय करू नये, असे मला वाटू लागले. त्या वेळी मी आशय प्रधान गायकीद्वारे शास्त्रीय गायनाला गझलची जोड दिल्याचे भीमराव पांचाळे यांनी सांगितले.
भीमराव पांचाळे यांच्या देश-विदेशात आतापर्यंत दोन हजाराच्यावर मैफील झालेल्या आहेत. यात विदेशात त्यांनी १९ मैफील करीत तेथीलही रसिकांची दाद मिळविली आहे.

आशय बोलका करते तीच गझल
गझल असो अथवा शास्त्रीय संगीत, त्यात शब्दांना महत्त्व असते. मात्र हेच शब्द स्वरांनी बोलके करणे गरजेचे असते. ज्या वेळी तुम्ही तुमचे गीत सादर कराल, समोरच्याला दाखवाल त्यावेळी त्या स्वरबद्ध शब्दांना आशयाचीही गरज असते आणि हा आशय बोलका झाला की त्यातून गझल जन्माला येते, अशी गझलची व्याख्या पांचाळे यांनी सांगितली. गझलचे पहिले वाक्य सादर करीत असताना पुढचे वाक्य काय असेल याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणे हेच महत्त्वाचे असते व पुढे जे अनपेक्षित मात्र प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे वाक्य सादर होते आणि त्याला जी दाद मिळत जाते त्यामुळे तासन् तास प्रेक्षक खिळून राहतात, असेही गझलचे वैशिष्ट पांचाळे यांनी स्पष्ट केले.

सुरेश भट यांच्या प्रेरणेने सुरू झाला प्रवास
गझल गायकीविषयी सांगताना पांचाळे यांनी मोठा रंजक प्रवास सांगितला. ते म्हणाले की, मुळात मी शास्त्रीय गायन शिकलो. गझलचे धडे गिरविले ते कविवर्य सुरेश भट यांच्या अमरावती शहरात. त्यामुळे सुरेश भट यांचे सान्निध्य लाभण्याचे भाग्य मिळाले व त्यांचे गीत प्रत्यक्ष ऐकण्याने मला मोठी प्रेरणा मिळाली. अमरावती येथे राजकमल चौकात सुरेश भट हे गीत सादर करीत असत त्या वेळी तेथे मोठी गर्दी होत असे. त्या वेळी मी इयत्ता नववीचा विद्यार्थी गर्दीतून वाट काढत घाबरत-घाबरत भट यांच्यापर्यंत पोहचत होतो, असेही पांचाळे यांनी आवर्जून सांगितले.

Web Title:  Changing feelings of hatred awakens humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.