खासदार ए.टी.पाटील यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:03 IST2019-03-29T12:02:54+5:302019-03-29T12:03:44+5:30
तालुका वार्तापत्र : पारोळा

खासदार ए.टी.पाटील यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान
पारोळा : गेल्या १० वर्षांपासून जळगाव लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे खासदार ए.टी.पाटील यांचे तिकीट कापले गेल्याने त्यांची नाराजी भाजपला भोवणार का? अशी चर्चा पारोळा तालुक्यात सुरू आहे. कोणतेही कारण न देता खासदार ए.टी.पाटील यांचे तिकीट कापले गेल्याने स्थानिक भाजपचे कार्यकर्ते हे कमालीचे नाराज आहेत. आणि खासदार ए.टी. पाटील यांनी वेगळी चूल मांडावी असे ते आग्रही आहेत.
असे असले तरी खासदार ए.टी.पाटील यांना जळगाव लोकसभेच्या उमेदवारीबाबत आपला फेरविचार होऊ शकतो, असा विश्वास वाटत आहे. म्हणूनच दोन दिवसात जर फेरविचार झाला नाही तर खासदार ए.टी.पाटील काय भूमिका कार्यकर्त्यांच्या जीवावर घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.
पारोळा तालुका हा जनसंघाचा तालुका आणि भाजपासाठी बालेकिल्ला समजला जातो. पण खुद्द तालुक्याच्या विद्यमान खासदाराचे तिकीट कापल्याने लोकांच्या मनात प्रचंड राग आणि रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे हा रोष मिटवून पारोळा तालुक्यात भाजपच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ यांना मताधिक्य घेण्याची कसरत करावी लागणार आहे. गेल्या निवडणुकीत खासदार ए.टी.पाटील यांना पारोळा तालुक्यातून १३ हजारांच्या पुढे मताधिक्य होते. ते स्मिता वाघ यांना टिकून ठेवायचे असले तर ए.टी.पाटील यांची नाराजी दूर करावी लागणार आहे.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांची तालुक्यात पहिली प्रचार फेरी पूर्ण झाली. त्यात तालुक्यातून आमदार डॉ.सतीश पाटील व माजी खासदार अॅड.वसंतराव मोरे यांची साथ देवकर यांना आहे. गुलाबराव देवकर हे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांचा चांगला संपर्क पारोळा तालुक्याशी होता.
सद्यस्थितीत भाजपची गटबाजी ही चव्हाट्यावर येत आहे. आणि ती त्वरीत न मिटविल्यास त्याचा लाभ राष्टÑवादीला होण्याची भिती आहे. एका बाजूला खासदार ए.टी.पाटील हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर प्रचंड नाराज आहेत.