खडू, पेन्सिल रुसली आता, रुसला रे माझा फळा...सांगा कधी होईल चालू अमुची शाळा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:22 IST2021-09-17T04:22:00+5:302021-09-17T04:22:00+5:30
जळगाव : कोरोनामुळे शहरातील बहुतांश गणेश मंडळांनी उत्सवातील देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम प्रशासनाच्या आवाहनानुसार रद्द केले आहेत. विशेष म्हणजे करोना ...

खडू, पेन्सिल रुसली आता, रुसला रे माझा फळा...सांगा कधी होईल चालू अमुची शाळा...
जळगाव : कोरोनामुळे शहरातील बहुतांश गणेश मंडळांनी उत्सवातील देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम प्रशासनाच्या आवाहनानुसार रद्द केले आहेत. विशेष म्हणजे करोना जनजागृतीचा विडा या मंडळांनी उचलला आहे. मंडळांकडून घरोघरी जाऊन कोरोना व लसीकरणाविषयी जनजागृती केली जात आहे. तर दीड वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे त्या कधी सुरू होणार या थीमवर एका गणेश मंडळाने आरास साकारली आहे.
यंदाचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक व्हावा, अशी मनपा प्रशासनाची धारणा आहे. त्यामुळे गणेश भक्तांनी प्रदूषण टाळण्यासाठी अनंत चतुर्दशीला बाप्पाचे घरच्या घरीच विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांनी पीओपीची मूर्ती स्थापना केली आहे. त्यांनी मूर्तीच्या वजनाएवढे अमोनियम बायकार्बोनेटचा वापर विसर्जनासाठी करावा. अन्यथा खाण्याच्या सोडा पाण्यात टाकून मूर्ती विसर्जन करावी. अमोनियम बायकार्बोनेटचा वापर केल्यास सहा ते आठ तासात मूर्ती विरघळते तर खाण्याचा सोड्याचा वापर केल्यास ४८ तासात मूर्ती विरघळते. तसेच निर्माल्य नदी, विहीर व तलावात न टाकता ते निर्माल्य संकलन केंद्रात द्यावे, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
००००००००००
शिव गणेश मित्र मंडळ (१७ सीटीआर ४५)
खडू, पेन्सिल रुसली आता, रुसला रे माझा फळा..सांगा कधी होईल, चालू आमुची आवडीची शाळा...असे साकडे आपल्या आरासमधून पिंप्राळा येथील शिव गणेश मित्र मंडळातर्फे गणरायाला घातले आहे. शिव गणेश मित्र मंडळ गेल्या चार वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहे. दीड वर्षांपासून कोरोनाने थैमान घातल्याने ऑफलाइन शिक्षण बंद होऊन ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. परंतु, यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे यंदा मंडळाकडून शिक्षणाची थीमवर आधारित आरास साकारण्यात आली आहे. तसेच दररोज आरतीला येणाऱ्यांना एक रोप मंडळातर्फे देण्यात येत आहे. यासाठी वैभव चौधरी, लोकेश भोलाणे, सागर परधी, पार्थ सोनार, सिध्दार्थ वाणी, भावेश पाटील, संकेत पाटील, जय पाटील, सुमित केवरे, अक्षय सोनार, रितेश पाटील, उदय चौधरी, पृथ्वी पाटील, राहुल शेळके, जयदीप पाटील आदी परिश्रम घेत आहे.
००००००००००००
अमर गणेश मित्र मंडळ (१७ सीटीआर ३४)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवेकानंद नगर येथील अमर गणेश मित्र मंडळातर्फे कोरोना व लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. यंदाचे मंडळाचे ३६ वे वर्ष आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करूया, क़ोरोनाला हरवू या...सुरक्षित अंतर पाळू या...लस घेऊन कोरोनाला हरवू या असा संदेश मंडळाकडून देण्यात येत आहे. तसेच दर्शनसाठी येणाऱ्या नागरिकांना मंडळाकडून मास्क वाटप केले जात आहे. दरवर्षी सामाजिक विषयांवर मंडळाकडून आरास साकारण्यात येत असते. केवळ मागील वर्षी कोरोनामुळे आरास साकारण्यात आली नसल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.
००००००००००००
वज्रेश्वरी देवी गणेश मंडळ (१७ सीटीआर ६०)
दरवर्षीप्रमाणे यंदाही वज्रेश्वरी देवी गणेश मंडळातर्फे सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात आला आहे. यंदा मंडळाचे अकरावे वर्ष आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून परिसरातील नागरिकांच्या घरी जाऊन लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. त्याचबरोबर रोजगार उत्सव मंडळाकडून राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर सलग दोन वर्ष मंडळाकडून फायबरपासून साकारलेली गणेशमूर्तीची मंडळात स्थापना करण्यात आली.