चाळीसगावला सीसीआय केंद्रांवर नोंदणी थांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 05:35 PM2020-12-01T17:35:16+5:302020-12-01T17:37:08+5:30

तळेगाव केंद्रावर कपाशीने भरलेल्या वाहनांची रांग होती.

Chalisgaon stopped registration at CCI centers | चाळीसगावला सीसीआय केंद्रांवर नोंदणी थांबवली

चाळीसगावला सीसीआय केंद्रांवर नोंदणी थांबवली

Next
ठळक मुद्देकपाशीची विक्रमी आवक: १९० वाहनांमधील कपाशी मोजणीच्या प्रतीक्षेत२६ हजार क्विंटल कपाशीची मोजणी

चाळीसगाव : दोन दिवस लागून आलेली सुट्टी, पुन्हा लॉकडाऊन अफवेमुळेही मंगळवारी तळेगाव व भोरस येथील सीसीआयच्या दोन्ही खरेदी केंद्रांवर मोठ्या संख्येने कपाशी वाहनांची आवक झाल्याने नवीन नोंदणी थांबविण्यात आली आहे. सीसीआय व्यवस्थापनाने तसे पत्रच बाजार समितीला दिले आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी नवीन नोंदणीसाठी वाहने आणू नये, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.
सीसीआय केंद्रांवर सात दिवसांपूर्वी कपाशी खरेदी सुरू झाली. सुरुवातीपासून खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा लागल्या. रविवार आणि सोमवारी गुरुनानक जयंती असल्याने केंद्रे बंद होती. मंगळवारी खरेदी पुन्हा सुरू झाल्याने भोरस आणि तळेगाव केंद्रांवर पुन्हा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यामुळे नव्याने नोंदणी थांबवण्यात आली आहे. पुन्हा नोंदणी करण्याबाबत सीसीआय सूचना करणार आहे.
प्रोसेसिंग धीम्या गतीने, कपाशी ठेवायला जागा नाही
कपाशी मोजणीचे काम धीम्या गतीने सुरू असल्याबाबत शेतकऱ्यांची अगोदरच नाराजी आहे. सद्य:स्थितीत खरेदी केलेल्या कपाशीवर केंद्रांमध्येच प्रोसेसिंग केली जाते. मात्र हे कामही येथे धीम्या गतीने सुरू असल्याने केंद्रांमधील मोकळी जागा कपाशीने फुल्ल झाली आहे. कपाशी ठेवायला जागा नसल्याने सीसीआयने नवीन नोंदणी थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. 
शेतकऱ्यांना सोसावा लागतो भूर्दंड
कपाशी भरलेली वाहने टोकननुसार उभी केली जातात. यामुळे शेतकऱ्यांना दर दिवशी ५०० रुपयांचा नाहक भूर्दंड सोसावा लागतो. वाहने एका दिवसासाठी ५०० रुपये अतिरिक्त भत्ता घेतात. मंगळवारी विक्रमी आवक झाल्याने तळेगाव व भोरस केंद्रावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती.
२९० वाहनांची आवक, १९० वाहने प्रतीक्षेत
मंगळवारी तळेगाव केंद्रावर ८० तर भोरस केंद्रावर १५० वाहने व ५५ बैलगाड्यांमधून कापूस मोजणीसाठी आला. दिवसअखेर १०० वाहने व ५५ बैलगाड्यांमधील कपाशी मोजली गेली. अजुनही १९० वाहने मोजणीच्या प्रतिक्षेत आहे. नवीन नोंदणीबाबत सीसीआयने कळविल्यानंतरच पुढील निर्णय होईल. 
२६ हजार क्विंटल कपाशीची खरेदी
तळेगाव व भोरस येथील केंद्रांवर गत आठ दिवसात २६ हजार क्विंटल कपाशीची खरेदी करण्यात आली आहे. शनिवारअखेर १९ हजार तर मंगळवारी दोन्ही केंद्रांवर जवळपास सात हजार क्विंटल कपाशी मोजली गेली. 
 
सीसीआयने नवीन नोंदणी थांबवल्याबाबत मंगळवारी पत्र दिले आहे. सद्य:स्थितीत केंद्रांवर कपाशी साठविण्यास जागा नाही. अजूनही १९०हून अधिक वाहने मोजणीसाठी उभी आहेत. पुढील सूचना येईपर्यंत शेतक-यांनी कपाशी नोंदणीसाठी वाहने आणू नयेत. नोंदणी सुरू करण्याविषयी लवकरच सूचना दिली जाईल.
- सतीश पाटील, प्रभारी सचिव, बाजार समिती, चाळीसगाव,

Web Title: Chalisgaon stopped registration at CCI centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.