चाळीसगावला गेल्यावर्षीच्या तुलनेत खरिपाची पेरणी पिछाडीवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST2021-07-01T04:13:38+5:302021-07-01T04:13:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने ओढ दिल्याने दि. ३० अखेर खरिपाची पेरणी पिछाडीवर आहे. गतवर्षी ...

चाळीसगावला गेल्यावर्षीच्या तुलनेत खरिपाची पेरणी पिछाडीवर !
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने ओढ दिल्याने दि. ३० अखेर खरिपाची पेरणी पिछाडीवर आहे. गतवर्षी ३० जूनअखेर ९० टक्के क्षेत्र लागवडीखाली आले होते. यंदा मात्र ‘लेट लतिफ’ ठरलेल्या पावसामुळे हे वेळापत्रक कोलमडले आहे. बुधवारअखेर एकूण उद्दिष्टापैकी ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या असून गतवर्षीच्या ताळेबंदानुसार यंदाचे हे क्षेत्र २५ ते ३० टक्क्यांनी पिछाडीवर आहे. यामुळे शेतकरी अजूनही चिंताक्रांत असून, पाऊस सर्वदूर सक्रिय होण्याची त्यांना प्रतीक्षा आहे.
मृग नक्षत्र सुरू होऊनही दडी मारून बसलेल्या पावसाने समाधानकारक कमबॅक करीत सोमवारी तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली. यामुळे खोळंबलेल्या खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याने शेती - शिवार चांगलेच गजबजून गेले आहे. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला या पावसाने दिलासा दिला असला तरी, त्याचे आता सातत्य असणे गरजेचे आहे. बागायती पिके तरारली असून धूळपेरणीवरील दुबारचे सावटही टळले आहे. मान्सूनपूर्व पावसाने परिसरात दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची जोरदार तयारी केली. तथापि, आठपासून मृग नक्षत्रावरच पाऊस गायब झाल्याने खरिपाच्या पेरणीला ब्रेक लागला होता. अधुनमधून तुरळक पाऊस होत असला तरी, शेतकऱ्यांना पेरणीसाठी दमदार पावसाची आवश्यकता होती. सोमवारी बहुतांशी भागात त्याने दमदार हजेरी लावल्याने पेरण्यांना वेग आला असून बुधवारअखेर ५६ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला असला तरी, विखुरलेल्या पावसाने शेतकरी अजूनही हवालदिल आहे. पाऊस सर्वच भागात सारख्या प्रमाणात सक्रिय नाही. तो विखुरलेला असल्याने काही भागातील पेरण्या अजूनही होऊ शकलेल्या नाहीत. यापुढील नक्षत्रांवर पावसाने छत्री धरावी, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
गेल्यावर्षाच्या तुलनेत खरिपाचे रिपोर्टकार्ड समाधानकारक नाही. गतवर्षी ३० जूनअखेर पावसाच्या सक्रियतेमुळे ९० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. यावर्षी पावसाने उसंत घेतल्याने बुधवारअखेर ५६ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे.
चाळीसगाव तालुक्याचे भौगिलिक क्षेत्र एक लाख २१ हजार ९०४ हेक्टर असून ९० हजार ३१८ वहिवाटीखालील आहे. ८१ हजार ४३२ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीचे उद्दिष्ट यावर्षी कृषी विभागाने निश्चित केले आहे.
१... एकूण लागवड क्षेत्रापैकी सर्वाधिक पेरा कपाशीचा होतो.
२..कोरडवाहू व बागायती असे एकूण ६१ हजार ६४८ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होणे अपेक्षित आहे.
३...सोमवारी झालेल्या पावसामुळे ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे.
४ कपाशीनंतर मका लागवडीच्या एकूण ११ हजार ३८४ हेक्टर उद्दिष्टापैकी बुधवारअखेर नऊ ते दहा हजार हेक्टरवर मका लागवड झाली आहे. उर्वरित लागवडीत तृणधान्ये व कडधान्यांचा समावेश आहे.
बागायती कपाशी तरारली
तालुक्यात मोठ्या क्षेत्रावर कपाशीची लागवड होते. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने यावर्षी बागायती कपाशीचा पेरा चांगला झाला. मेच्या अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या या पेरणीस सोमवारी झालेल्या पावसाने बुस्टर डोसच दिला आहे. ही कपाशी तरारली आहे. या क्षेत्रावरील पेरणीनंतरच्या मशागतीलाही वेग आला आहे.
धूळपेरणीला ‘जीवदान’
आभाळभरोसे होणाऱ्या धूळपेरणीवर पावसाने दडी मारल्याने ‘दुबार’चे सावट गडद झाले होते. मात्र २० व २१ सह सोमवारी झालेल्या पावसाने या पेरणीलाही जीवदान मिळाले असून दुबारचे मळभ हटले आहे. पाच ते सहा हजार हेक्टरवर हा पेरा झाला आहे. धूळपेरणी केलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.
मृग नक्षत्र कोरडेच
आठपासून सुरू झालेल्या मृग नक्षत्राचे जवळपास १३ दिवस कोरडेठाकच गेले आहेत. १९ व २० रोजी काही भागात पाऊस पडला. मात्र तो दमदार नव्हता. दि. २१ पासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली आहे. या नक्षत्रावरही पावसाची उसंत कायम होती. तब्बल सात दिवसांनंतर २८ रोजी आर्द्रा नक्षत्रातील दमदार आभाळधारा कोसळल्या. या पावसानेच खऱ्याअर्थाने खरिपाच्या हंगामाला चालना दिली आहे.
बुधवारअखेर तालुक्यात १६६.५५ पावसाची नोंद महसूल विभागाने केली आहे.
७२९ मि.मी. पाऊस हा तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाचा अंतिम निर्देशांक आहे.
पाच जुलैपासून पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात होत असून बळीराजाची व पेरणी झालेल्या पिकांची सर्व भिस्त या नक्षत्रावर आहे.