दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल अकरावी प्रवेशाची सीईटी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:16+5:302021-07-02T04:12:16+5:30
जळगाव : यंदाच्या अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे. ही परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ...

दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल अकरावी प्रवेशाची सीईटी परीक्षा
जळगाव : यंदाच्या अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे. ही परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार असून परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील. विशेष म्हणजे, अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक असणार आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्यामुळे इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. परिणामी, आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी राबविणार हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, नुकतेच काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेच्या आयोजनासाठी समिती देखील नियुक्त करण्यात आली आहे.
केद्रांची यादी होईल घोषित
इयत्ता अकरावीची प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असल्याने इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर राज्य मंडळ / परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला प्रवीष्ट होण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच दहावीच्या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क अदा केलेले असल्याने अशा विद्यार्थ्यांना सामायिक परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही. तथापि, सीबीएसई, सीआयएससीई व सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे व अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षेसाठी राज्य मंडळाकडून विहित करण्यात येणारे शुल्क अदा करावे लागणार आहे.
रिक्त जागांवर यांना मिळेल प्रवेश...
इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविताना सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. तसेच सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामायिक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या मूल्यमापन पध्दतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल.
-----
जिल्ह्याची स्थिती...
एकूण महाविद्यालये : २१८
अनुदानित महाविद्यालये : १४५
विनाअनुदानित महाविद्यालये : ५०
स्वयंअर्थसाहाय्यित महाविद्यालये : २३
------
अकरावी प्रवेश क्षमता...
कला शाखा : २४,३२०
विज्ञान शाखा : १७,२००
वाणिज्य शाखा : ५,३६०