केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुध्द जळगावात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:21 IST2021-08-25T04:21:42+5:302021-08-25T04:21:42+5:30
जळगाव : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी एकेरी व अपशब्द वापरल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुध्द मंगळवारी दुपारी शहर पोलीस ...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुध्द जळगावात गुन्हा दाखल
जळगाव : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी एकेरी व अपशब्द वापरल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुध्द मंगळवारी दुपारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापौर जयश्री महाजन यांनी फिर्याद दिली आहे. राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जळगाव शहरातही तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात जावून कोंबड्या फेकून आंदोलन केले. त्यानंतर महापौरांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
महापौरांनी तक्रारीत म्हटले आहे की, नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना उद्देशून ‘महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला किती वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य मिळून, मी असतो तर कानाखालीच चढविली असती तसेच सीएम गेला उडत, पाय बघायला पाहिजे पांढऱ्या पायाचा मुख्यमंत्री’ अशा शब्दात एेकेरी भाषेत टिका केली. त्याशिवाय २३ ऑगस्ट रोजी महाड येथे पत्रकार परिषदेत बदनामीकारक, द्वेषभाव निर्माण करणारी विधाने करुन समाजात शत्रुत्व व द्वेषाची भावना निर्माण होईल असे वक्तव्य केले. राजशिष्टाचाराचा अपमान, घटनात्मक पदाची व प्रतिष्ठीत राजकीय व्यक्तिमत्वाच्या लौकिकास बाधा आणून शिवसेनेची बदनामी केली. त्यांच्या या विधानामुळे जिल्ह्यात असंतोषाचे वातावरण पसरले आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.