जादा दराने मंजूर रस्त्याच्या निविदेचा ठराव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 12:57 IST2019-11-30T12:56:39+5:302019-11-30T12:57:06+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णय

जादा दराने मंजूर रस्त्याच्या निविदेचा ठराव रद्द
जळगाव : पाचोरा शहरात नगरपालिकेच्यावतीने करण्यात येणाºया रस्त्याच्या कामाची निविदा ९.९९ टक्के जादा दराने मंजूर केल्याचा पाचोरा नगरपालिकेच्या स्थायी समितीचा ठराव रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला. हे काम मंजूर अंदाजपत्रकाच्या दरानुसार करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
पाचोरा नगरपालिकेच्या २ मार्च २०१९ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शहरात दिलीप वाघ यांच्या घरापासून ते एन.आर. ठाकरे व पुढे राजेश काळे यांच्या घरापर्यंत रस्ता करण्याचा ठराव ४० व ४१ क्रमांकाने बहुमताने मंजूर करण्यात आला व हे काम चाळीसगाव येथील सिद्धी विनायक ट्रेडर्सला देण्यात आला. हा ठराव ९.९९ टक्के जादा दराने असून त्यातून निधीचा अपव्यय होणे व तो न.पा.च्या हिताचा नसल्याची तक्रार पाचोºयाचे माजी नगराध्यक्ष संजय ओंकार वाघ, भूषण दिलीप वाघ व रंजना प्रकाश भोसले यांनी ११ जुलै २०१९ रोजी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. त्यावर ८ आॅगस्ट २०१९ रोजी सुनावणी होऊन सदर प्रकरण निकालासाठी बंद करण्यात आले होते.
यामध्ये मुख्याधिकाºयांनी सदर ठरावास दर्शविलेला विरोध, मक्तेदारासोबत वाटाघाटी न करणे व लेखा परिक्षण अहवाल यांचा विचार न करता बहुमताने ठराव मंजूर करणे या अर्जदाराच्या तक्रारीत तथ्थ आढळून आल्याने २८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी हा ठराव रद्द केला. तसेच हे काम सिद्धी विनायक ट्रेडर्सने अंदाज पत्रकीय दरानुसार करण्याचे आदेशही दिले.