जळगावात भरदिवसा दोन ठिकाणी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:22 IST2019-07-27T12:21:40+5:302019-07-27T12:22:04+5:30
घरमालक सत्संग आणि परीक्षेला गेल्याची संधी

जळगावात भरदिवसा दोन ठिकाणी घरफोडी
जळगाव : शहरात दररोज दिवसा किंवा रात्री चोरी व घरफोडीच्या घटना घडत आहेत. दोन महिन्यापासून तर एकही दिवस खंड पडलेला नाही. शुक्रवारी तर श्रध्दा कॉलनीतील नंदनवन कॉलनीत भरदिवसा सकाळी १० ते ११ या एक तासातच दोन ठिकाणी घरफोडी झाली. एक घरमालक पत्नीसह सत्संगाला तर दुसरा घरमालक औरंगाबादला असल्याने त्यांचा मुलगा तलाठी पदाची परीक्षा देण्यासाठी गेला होता.
नंदनवन कॉलनीत शरद सुधाकर चव्हाण हे पत्नी प्रतिभा व मुलासह वास्तव्यास आहेत. ते इलेक्ट्रीकच्या दुकानावर कामाला आहे. मुलगा शाळेत गेला होता तर चव्हाण दाम्पत्य सकाळी ९ वाजता घराला कुलुप बंद करुन रिंगरोडवरील यशोदाय हॉल येथे सत्संगाच्या कार्यक्रमासाठी गेले होते.
कार्यक्रम संपल्यानंतर ११.३० वाजता ते घरी आले असता घर उघडे तर घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता. एका कपाटात ठेवलेले ११ हजार रुपये पत्नीचे काही दागिने चोरट्यांनी लांबविल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. सुदैवाने काही रक्कम व दागिने सोबतच असल्याने ते सुरक्षित राहिले.
सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातून लांबविले लाखांचे दागिने
चव्हाण यांच्या घरापासून काही ५० फुट अंतरावर असलेल्या सेवानिवृत्त शिक्षक विश्वनाथ श्रीधर चौधरी यांच्या मधूबन या बंद घरातून दोन तोळ्याचे मंगळसूत्र, प्रत्येकी ५ ग्रॅमचे कानातील तीन जोड, साडे सात ग्रॅमच्या साखळ्या, ५ ग्रॅमची अंगठी असा लाखो रुपयाची ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. बेडरुमधील साहित्याची नासधूस केली आहे. एका प्लास्टीकच्या डब्यात ठेवलेले १ हजाराच्यावर काही रक्कम सुरक्षित होती.