६३ हजारांचा ऐवज लंपास
चोरट्याचा बंद खिडकीतून प्रवेश
नशिराबाद : चोरट्यांनी बंद घराच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीतून प्रवेश करीत घरातून ६३ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना परकोट मोहल्ला परिसरात घडली. चोरीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. डॉ नजरूल इस्लाम खलील अहमद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नजरुल इस्लाम यांच्यासह कुटुंबीय ३ सप्टेंबर रोजी बाहेरगावी गेले होते. त्यांच्या बंद घराच्या खिडकीतून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून ६३ हजार १०० रुपयांचे दागिने व रोख रक्कम लांबवली. ९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता कुटुंबीय घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घरात सर्वत्र सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. चोरी झाली असल्याचे निदर्शनास येताच डॉक्टर नजरुल इस्लाम यांच्यासह कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यात ३७ हजार ५०० रुपये किमतीची दीड तोळे वजनाची सोन्याची पोत, १७ हजार ५०० रुपये किमतीच्या सोन्याच्या २० अंगठ्या, २५०० रुपये किमतीची एक ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, पाच हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल व सहाशे रुपये किमतीच्या तीन चांदीच्या अंगठ्या असा सुमारे दहा ग्रॅम वजनाच्या तीन चांदीच्या अंगठ्या असे एकूण ६३ हजार शंभर रुपयाचा ऐवज चोरीला गेला असल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, मोहन चौधरी, प्रवीण ढाके तपास करीत आहेत.