कुटुंबिय झोपलेले असताना घरात डल्ला मारणारा चोरटा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST2021-05-29T04:13:33+5:302021-05-29T04:13:33+5:30
फोटो : ४.४७ वाजेचा मेल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कुटुंबिय झोपलेले असताना घरात डल्ला मारून २६ हजार रूपयांची ...

कुटुंबिय झोपलेले असताना घरात डल्ला मारणारा चोरटा जेरबंद
फोटो : ४.४७ वाजेचा मेल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कुटुंबिय झोपलेले असताना घरात डल्ला मारून २६ हजार रूपयांची रोकड व तीन मोबाईल लंपास करणा-या सराईत चोरट्यास पकडण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. गणेश बाबुराव कोळी (२४, रा.एमआयडीसी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
एमआयडीसीतील यश इंडस्ट्रीजच्या आवारात नुर मेहंदी हसन हे कुटूंबासह वास्तव्यास आहेत. २८ डिसेंबर २०२० रोजी हसन कुटूंब घरात झोपलेले असतान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात डल्ला मारत २६ हजार ५०० रूपयांची रोकड व साडे आठ हजार रूपये किंमतीचे तीन मोबाईल, असा एकूण ३५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी नुर मेहंदी हसन यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस चोरट्याच्या शोध घेत होते.
कडगाव येथून अटक
घरफोडी करणारा चोरटा हा गणेश बाबुराव कोळी हा असून तो तालुक्यातील कडगाव येथे असल्याची माहिती गुरूवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिसांना मिळाली. रात्री १० वाजता पोलिसांनी त्यास सापळा रचून अटक केली. कसून चौकशी केली असता, त्याने चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली व एक मोबाईल पोलिसांना काढून दिला.
३१ पर्यंत पोलीस कोठडी
शुक्रवारी पोलिसांनी संशयित चोरटा गणेश कोळी याला न्यायालयात हजर केले. सुनावणीअंती त्यास ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस कर्मचारी गफ्फार तडवी, अतुल वंजारी, सचिन पाटील, चेतन सोनवणे, इमरान सैय्य्द, मुदस्सर काझी आदींनी केली आहे.
दहा गुन्हे आहेत दाखल
गणेश हा सराईत गुन्हेगार आहे. याच्याविरूध्द विविध पोलीस ठाण्यांमध्ये दहा गुन्हे दाखल आहेत. फैजपूर पोलीस ठाण्यात २, नशिराबाद पोलीस ठाण्यात ३ तसेच भुसावळ पोस्टेला १ तर एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल आहेत.