बी.एस. पाटील यांच्या भाषणाची क्लिप प्रांताधिकारी तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 12:33 IST2019-04-14T12:33:08+5:302019-04-14T12:33:50+5:30
विनयभंग तक्रार पारोळा पोलिसांनी पाठविला अहवाल

बी.एस. पाटील यांच्या भाषणाची क्लिप प्रांताधिकारी तपासणार
जळगाव/पारोळा/अमळनेर : पारोळा येथील भाषणात माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील यांनी आमदार स्मिता वाघ यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची व्हीडिओ क्लिप तपासून एरंडोल प्रांत विनय गोसावी आपला अहवाल देणार आहेत. त्यानंतर त्यांच्या अहवालावरून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पोलीस घेतील असे सूत्रांनी सांगितले.
पारोळा येथे गेल्या महिन्यात २६ मार्च रोजी खासदार ए.टी. पाटील यांनी आयोजित केलेल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी आमदार बी.एस. पाटील यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आमदार स्मिता वाघ यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा तक्रार अर्ज अमळनेर येथील शीतल देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लिलाधर काकडे यांच्याकडे दिला होता.
सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र
पोलीस उपनिरीक्षक देवरे यांनी प्राप्त तक्रार, आपला अहवालाची प्रत व पारोळा पोलीस स्टेशनचे पत्र सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांना दिले आहे. निवडणूक काळातील हा विषय असल्याने प्रत्यक्ष घटनास्थळी काय झाले? तक्रारीनुसार विनय भंगाचा गुन्हा दाखल करता येईल काय? हे तपासून तसा अहवाल मिळावा असे पोलिसांनी कळविले आहे. त्यानुसार एरंडोल विभागाचे प्रांत तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी विनय गोसावी पारोळ्यातील भाषणाचा व्हीडीओ तपासून विनय भंग होणारे वक्तव्य डॉ. बी.एस. पाटील यांनी केलय काय? याबाबतचा अहवाल पारोळा पोलिसांना देणार आहेत. त्यानंतर पोलीस निर्णय घेतील असे सूत्रांनी सांगितले.
बी.एस. पाटील अमळनेरला परतले
अमळनेरात आयोजित युतीच्या मेळाव्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांच्या समर्थकांनी माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांना बेदम मारहाण केली होती. यानंतर ११ रोजी डॉ. बी.एस. पाटील हे उपचारासाठी धुळे येथील एका खासगी रूग्णालयात दाखल झाले होते. शुक्रवारी त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.
शनिवारी दुपारी १२ वाजता डॉ. बी.एस. पाटील हे अमळनेर येथील आपल्या निवासस्थानी आले. आता तब्बेत ठिक असून नाकाला फ्रॅक्चर व लिव्हरला दुखापत झाल्याने आता विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याचे बी.एस. पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
चौकशीचे दिले आदेश
पोलीस निरीक्षक काकडे यांनी याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अजितसिंग देवरे यांच्याकडे हा अर्ज चौकशीसाठी दिला होता. त्यानुसार त्यांनी तपास करून एक अहवाल तयार केला आहे.