कोरोना काळात दलाल शिरजोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:17 IST2021-04-27T04:17:36+5:302021-04-27T04:17:36+5:30
कोरोनाच्या संकटामध्ये एकमेकांना मदतीसाठी धावून जाणे अपेक्षित असताना नेमके याच काळात रुग्ण व त्यांच्या असहायतेचा फायदा घेत आवश्यक औषधींचा ...

कोरोना काळात दलाल शिरजोर
कोरोनाच्या संकटामध्ये एकमेकांना मदतीसाठी धावून जाणे अपेक्षित असताना नेमके याच काळात रुग्ण व त्यांच्या असहायतेचा फायदा घेत आवश्यक औषधींचा काळाबाजार होत आहे. आवश्यक औषधी मिळणे कठीण झाले असताना नातेवाईकांना प्रामाणिकपणे मागणी करून आवश्यक इंजेक्शन न मिळता ते दलालांकडून जादा किंमत देऊन उपलब्ध होत असल्याचा विदारक अनुभव जिल्हावासीय घेत आहे. एकूणच जिल्ह्यातील ही स्थिती पाहता किती जरी उपायोजना केल्या तरी दलाल शिरजोर होत असल्याचे दररोजच्या फिरफिरवरून समोर येत आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग उद्भवला त्यावेळी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण यंदाच्या तुलनेत कमी होते. त्यानंतर परिस्थिती सुधारली व सर्वकाही सुरळीत झाल्याचे वाटत होते. मात्र गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून पुन्हा रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. यंदा तर रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे साहजिकच ऑक्सिजन, रेमडेसिविर व इतर औषधींची मागणीदेखील त्या तुलनेत वाढत आहे. ऑक्सिजन मिळणे कठीण झाल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची मोठी फिरफिर झाली. यासोबतच रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वेगवेगळ्या जणांशी संपर्क साधावा लागत आहे. यात हे इंजेक्शन जादा दराने विक्री होऊ लागली आहे. जिल्हा प्रशासनाने इंजेक्शन थेट रुग्णालयात उपलब्ध करून दिले जातील, असे सांगितले मात्र तरीदेखील रुग्णांना ते मिळत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांची भटकंती कायम आहे. एखाद्या मेडिकलवर गेले असता हे इंजेक्शन सहजासहजी मिळत नाही. बाहेरील व्यक्तीकडून जादा किंमत देऊन ती उपलब्ध होत आहे. यामध्ये चार दिवसापूर्वी पोलिसांनी काळाबाजार करणाऱ्यांना पकडले. जळगाव, भुसावळ व अन्य ठिकाणीदेखील अशा कारवाई झाल्या. इतरही इंजेक्शन घ्यायचे झाल्यास ते मिळत नाही. यात गरीब असो की श्रीमंत या सर्वांनाच याचा अनुभव येत आहे. त्यामुळे त्यांची ही गरज पाहता दलाल त्यांना बरोबर हेरतात व अमुक अमुक इंजेक्शनसाठी इतकी रक्कम मोजावी लागेल, अशी थेट मागणी करतात. त्यामुळे रुग्णालय, मेडिकल या ठिकाणी हे इंजेक्शन मिळत नसताना बाहेरील व्यक्ती त्या कशा आणून देतात, ही स्थिती पाहता किती जरी उपायोजना झाल्या तरी दलाल शिरजोर ठरत असल्याचे सर्वजण अनुभव घेत आहे. आता यावर पर्याय म्हणून प्रशासन थेट रुग्णालयांना रेमडेसिविरचे वितरण करीत आहे. प्रत्येक रुग्णालयातील रुग्णांची संख्या पाहून हे रेमडेसिविर दिले जाते आहे. मात्र एका रुग्णाच्या वाट्याला ते किती येतील, हादेखील प्रश्न आहे. जिल्ह्याला पुरवठा होणाऱ्या रेमडेसिविरचा पुरवठा पाहता रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत ते कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे यावर योग्य तोडगा निघणेदेखील गरजेचे आहे.