निधी व परवानगीअभावी ‘जलयुक्त’ला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST2021-06-11T04:12:33+5:302021-06-11T04:12:33+5:30
मार्च २०२० नंतर काम नाही : पहिल्या चार टप्प्यात ८९५ गावे जलयुक्त लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गावागावात पाणीसाठा ...

निधी व परवानगीअभावी ‘जलयुक्त’ला ब्रेक
मार्च २०२० नंतर काम नाही : पहिल्या चार टप्प्यात ८९५ गावे जलयुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गावागावात पाणीसाठा व भूजल पातळीत वाढ व्हावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेला निधी व परवानगीअभावी ब्रेक लागला आहे. ३१ मार्च २०२० नंतर अभियान बंद आहे. तत्पूर्वी चार टप्प्यांमध्ये ८९५ गावांमध्ये जलयुक्तची कामे झाली.
२०१५ पासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात झाली. चार टप्प्यांमध्ये जलयुक्तची कामे झाली. मात्र त्यानंतर २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला व निधीची कमतरता भासू लागली. त्यात सरकारही बदलल्याने ही योजना पुढे सुरू राहिली नाही. निधीची उपलब्धता नाही व राज्य शासनाकडूनही कामे करण्यास परवानगी मिळाली नाही, त्यामुळे जलयुक्तची कामे होऊ शकली नाही.
चौथ्या टप्प्यात मिळाली मुदतवाढ
चार टप्प्यांमध्ये झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामामध्ये २०१५-१६ या पहिल्या टप्प्यात २३२ गावांमध्ये कामे झाले. त्यानंतर २०१६-१७ मध्ये २२२, २०१७-१८ मध्ये २०६, २०१८-१९मध्ये २३५ असे एकूण ८९५ गावांमध्ये जलयुक्तची कामे झाले. चौथ्या टप्प्यामधील कामांना मार्च २०२०पर्यंत मुदतवाढ मिळाली होती. ३१ मार्च २०२० नंतर हे अभियान बंद झाले. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यामध्ये ही कामे होऊ शकली नाही.