वाहतूक नियम तोडल्यास लायसन्स होऊ शकते रद्द!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:19 IST2021-09-14T04:19:36+5:302021-09-14T04:19:36+5:30
सुनील पाटील जळगाव : वाहतूक नियमांचा भंग केल्यानंतर केवळ दंड भरून सुटका होते असे नाही तर, अनेकवेळा लायसन्सचे निलंबनही ...

वाहतूक नियम तोडल्यास लायसन्स होऊ शकते रद्द!
सुनील पाटील
जळगाव : वाहतूक नियमांचा भंग केल्यानंतर केवळ दंड भरून सुटका होते असे नाही तर, अनेकवेळा लायसन्सचे निलंबनही केले जाते. जळगाव शहर वाहतूक पोलिसांनी २०१८ ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत नियम तोडणाऱ्या ४४ जणांचे लायसन्स रद्द केले आहे. त्याशिवाय आणखी काही प्रस्ताव आरटीओ कार्यालयाकडे पाठविलेले आहेत. त्यामुळे दंड भरून सुटका होते, हा भ्रम वाहनधारकांनी काढून टाकावा, यापुढे आणखी कठोर कारवाई करण्याचा इशारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांनी दिला आहे.
परिवहन विभागाने वाहन चालविण्यासाठी काही नियम ठरवून दिली असून ते नियम वाहन चालविणाऱ्या व्यक्तीसह पुढील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी देखील आहेत. अनेक वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन होते. त्यात निष्पाप लोकांचा जीव जातो तर, काही जणांना दुखापत होते. या घटना टाळण्यासाठीच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलीस तसेच आरटीओंकडून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र एवढ्यावरच पुरेसे नसून वारंवार नियमांना तोडणाऱ्यांचे नाइलाजास्तव लायसन्सही वाहतूक नियंत्रण शाखेकडून निलंबन तसेच रद्द केले जातात. वाहनधारकांनी स्वत:चा तसेच इतरांच्या जीवाचा विचार करता वाहतूक नियमांचे पालन करावे. शक्यतो मद्याच्या नशेत, भरधाव वेगाने वाहने चालवू नये, असे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आलेले आहे.
चार वर्षांत झालेली कारवाई
वर्ष लायसन्स निलंबन
२०१८ १५
२०१९ २२
२०२० ०५
२०२१ (ऑगस्टपर्यंत) ०२
हे नियम मोडल्यास लायसन्सचे निलंबन
- क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात बसवून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केला तसेच अतिवेगात वाहन चालविल्यास लायसन्स रद्द केले जाऊ शकते.
- मद्यप्राशन, अमली पदार्थांचे सेवन करून तसेच सिग्नल तोडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास लायसन्स रद्द केले जाऊ शकते.
-मोबाईलवर बोलताना वाहन चालविणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करीत असल्यास लायसन्स रद्द केले जाऊ शकते.
आधी तीन महिने, नंतर कायमस्वरूपी
एखाद्याकडून नियमांचे वाहतूक नियमाचे उल्लंघन झाल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतरही वारंवार ती व्यक्ती वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असेल तर मात्र अशा व्यक्तीला ठरावीक कालवधीसाठी मुदत दिली जाते. मात्र, त्यानंतरही काहीच फरक पडत नसल्यास लायसन्स रद्दचीच कारवाई करावी लागते.
अशी होते कारवाई...
वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या व्यक्तीला २-३ वेळा दंडात्मक कारवाई करून सोडले जाते. मात्र वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यास अशा व्यक्तीचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाते. यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठविला जातो. त्यांच्याकडूनच ही कारवाई केली जाते.
नियमांचे पालन करा...
प्रत्येक वाहनधारकाने नियम पाळणे अपेक्षितच आहे. दंड होतो, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा तीच चूक करू नये. ही चूक जीवावर देखील बेतू शकते. त्यामुळे नियमांचे पालन करूनच नेहमी वाहन चालवावे. सातत्याने नियम तोडले जात असतील, मद्याच्या नशेत वाहन चालविले जात असेल किंवा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहन चालवून प्रवाशांच्या जीवाला धोक निर्माण करणाऱ्यांचे लायसन्स निलंबित केले जाते.
- लीलाधर कानडे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा